मुंबई, दि. ०२ (क्षितिज कदम) – पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनाचा परिसर जोरदार घोषणांनी दणाणून गेला, कारण महाविकास आघाडीच्या आमदारांनी मेघा इंजिनिअरिंग टेंडर घोटाळा आणि शेतकरी प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलं. “भ्रष्टाचाराचे लाभार्थी कोण? शिंदे-फडणवीस!” अशा घोषणांनी वातावरण तापवण्यात आलं.
महाविकास आघाडीने आरोप केला की, मेघा इंजिनिअरिंग या ‘लाडक्या’ कंपनीला जलसिंचन, रस्ते विकास, ऊर्जा प्रकल्पांसह अनेक महत्त्वाची कंत्राटं देण्यात आली असून, त्यात सुमारे ३ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत विरोधकांनी सरकारचा निषेध केला.
“भाजपची अर्थपुरवठादार कंपनी?”
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत सांगितलं, “मेघा इंजिनिअरिंग हीच ती कंपनी आहे जी भाजपला सर्वाधिक इलेक्टोरल बाँड्स देणारी आहे. जाणीवपूर्वक या कंपनीलाच टेंडर देण्यात आलं. सुप्रीम कोर्टात याविरोधात प्रकरण गेल्यानंतर सरकारला टेंडर मागे घ्यावं लागलं, आणि त्यामुळेच भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. आम्ही आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर उतरलो आहोत. उद्या गरज पडल्यास रस्त्यावरही उतरणार.”
यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या आमदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी केली. “ही सरकारशिष्ट कंपनी आहे”, “शेतकऱ्यांचा पैसा खाणाऱ्या मंत्र्यांचा धिक्कार असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
सभागृहातही गदारोळ; शेतकरी मुद्द्यावरून विरोधक आक्रमक
सभागृहातही वातावरण तापलेले होते. अकोला जिल्ह्यातील उरळ (ता. बाळापूर) येथे सोयाबीन खरेदीत झालेल्या गैरव्यवहारावरून तारांकित प्रश्नाच्या वेळी विरोधकांनी आवाज उठवला. “शेतकऱ्यांची थकलेली रक्कम तात्काळ द्या,” अशी मागणी करत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. मात्र, कृषीमंत्री जयकुमार रावल यांचं उत्तर समाधानकारक नसल्यामुळे सभागृहात गदारोळ उडाला.
“या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वर पाय!” या घोषणा देत विरोधकांनी सभात्याग केला. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबतही सरकारला धारेवर धरले. मात्र काही वेळाने विरोधक पुन्हा सभागृहात परतले.
नाना पटोले निलंबनाचे पडसाद
या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर कालच्या नाना पटोले यांच्या निलंबनाचे पडसादही अधिवेशनात जाणवले. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावरून सरकारवर टीका करताना काल पटोले यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी त्यांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. आज विरोधकांनी त्यावरूनही आक्रमक भूमिका घेतली.