“अहमदाबादमध्ये मृत्यूचा आकाशमार्ग! एअर इंडिया विमान अपघातात 242 जणांचा करुण अंत”

अहमदाबाद, दि. १२ (वृत्तसंस्था): गुजरातच्या अहमदाबाद शहरात सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाइट 171 या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व 242 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं वृत्त जगप्रसिद्ध असोसिएटेड प्रेस (AP) वृत्तसंस्थेने दिलं असून, देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. हे विमान उड्डाणानंतर अवघ्या सात मिनिटांत कोसळलं.
अपघाताचं भयावह दृश्य: विमान थेट मेघानीनगर वसाहतीवर कोसळलं
दुपारी 1:31 वाजता टेकऑफ झालेलं एअर इंडियाचं बोईंग ड्रीमलाइनर 787 विमान केवळ सात मिनिटांतच अहमदाबाद शहरातील मेघानीनगर या दाट लोकवस्तीच्या भागात कोसळलं. अपघाताचं दृश्य इतकं भयानक होतं की, संपूर्ण परिसरात धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या. अपघातस्थळी 8200 तासांचा अनुभवी पायलट कॅप्टन सुमित सभरवाल यांनी मे-डे (आपत्कालीन संदेश) दिला होता, मात्र परिस्थितीवर नियंत्रण येण्याआधीच विमान जमिनीवर आदळलं.
B.J. मेडिकल कॉलेजवर कोसळलं विमान, 45 भावी डॉक्टर जखमी
विमान मेघानीनगरमधील बी. जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळल्यामुळे हॉस्टेलमध्ये जेवण करणारे अनेक भावी डॉक्टर यामध्ये जखमी झाले. ताज्या माहितीनुसार, सुमारे 45 डॉक्टर जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. परिसरात मृतदेहांचे अवशेष विखुरले गेले होते. संध्याकाळपर्यंत 100 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते.
प्रवाशांची आकडेवारी आणि ओळख
दुर्घटनाग्रस्त विमानात 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्स असे एकूण 242 जण होते. यामध्ये 169 भारतीय, 53 ब्रिटीश नागरिक, 7 पोर्तुगीज, आणि 1 कॅनडाचा नागरिक होता. महाराष्ट्रातील 6 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये अपर्णा महाडिक, मैथिली पाटील, रोशनी सोनघरे (क्रू मेंबर्स) तसेच महादेव पवार, आशा पवार आणि मयूर पाटील (प्रवासी) यांचा समावेश होता.
विशेष लक्षवेधी घटना: अपर्णा महाडिक यांचा मृत्यू
मृत झालेल्या क्रू मेंबर्समध्ये अपर्णा महाडिक यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे नातेवाईक आहेत. अपर्णा या खासदार तटकरे यांच्या भाच्याच्या पत्नी होत्या. अमोल महाडिक हे स्वतः एअर इंडिया मध्ये पायलट आहेत. या दुर्घटनेने तटकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विजय रुपाणी आणि कुटुंबीयही होते प्रवासात
या विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि त्यांचे कुटुंबीयही प्रवास करत होते. ते गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे, मात्र त्याविषयी अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
टाटा समूहाची संवेदना आणि मदतीची घोषणा
एअर इंडिया ही टाटा समूहाची मालकी असलेली कंपनी आहे. या दुर्घटनेनंतर टाटा समूहाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. याशिवाय जखमींवरचा संपूर्ण वैद्यकीय खर्चही टाटा समूह उचलणार आहे. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या नव्या उभारणीतही टाटा ग्रुप मदत करणार आहे.
राजकीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या घटनेमुळे आपला शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिलं की, “ही दुर्घटना अत्यंत दु:खद असून माझ्या भावना मृतांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.” तर ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी देखील शोक व्यक्त करत ही घटना हृदयद्रावक असल्याचं म्हटलं आहे.
सुरक्षेचा प्रश्न आणि तपासाची दिशा
DGCA आणि नागरी उड्डाण मंत्रालयाने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी तातडीने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. विमान दुर्घटनेपूर्वी मे डे कॉल मिळाल्यामुळे यामध्ये यांत्रिक बिघाड, पक्षी धडक, किंवा तांत्रिक चूक अशी शक्यता तपासली जात आहे.
अहमदाबाद विमानतळ बंद
तत्काल प्रभावाने अहमदाबाद विमानतळ बंद करण्यात आले असून सर्व फ्लाइट्स इतर विमानतळावर वळवण्यात आल्या आहेत. दुर्घटना स्थळाजवळील संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे.
गुजरातमधील ही विमान दुर्घटना देशाच्या इतिहासातील अत्यंत दुर्दैवी आणि मोठ्या हानीची घटना ठरली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना या अपघातातून सावरणं अत्यंत अवघड आहे. मात्र प्रशासन, टाटा ग्रुप, आणि वैद्यकीय यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत आहे.

अधिकृत भारतीय यंत्रणांकडून मृत्यूंची अंतिम पुष्टी अद्याप प्रतीक्षेत आहे, मात्र सरकार आणि एअर इंडिया यांच्याकडून ही दुर्घटना अतिशय गंभीर मानली गेली आहे आणि मदत कार्य तातडीनं सुरू झालं आहे.

आणखी वाचा