अजित पवारांचा निर्धार : सर्व समाजघटकांना भेदभावमुक्त शिक्षणाची हमी

मुंबई, दि. ८ (प्रतिनिधी) : “शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा चालवत आम्ही कोणताही भेदभाव न करता सर्व समाजघटकांतील विद्यार्थी, युवक व युवतींना दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत,” असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.
बुलढाणा व छत्रपती संभाजीनगर येथे विविध पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी अजित पवारांच्या उपस्थितीत मोठा मेळावा झाला.
अजित पवार म्हणाले की, “सर्वधर्मसमभाव ही आमची मूलभूत भूमिका असून सर्व घटकांना पक्षाशी जोडण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने करत आहे. जातनिहाय जनगणना लवकरच होणार असून २०२९ च्या निवडणुकीत समाजातील वस्तुस्थिती समोर येईल. शहरी व ग्रामीण भागातील सर्वांसाठी पक्ष काम करत आहे.”
विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते सतत नव्या विषयांची उठाठेव करतात, असाही टोलाही त्यांनी लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असेही आवाहन अजित पवारांनी केले.
या कार्यक्रमात संभाजीनगर व बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आणि इतर पक्षांतील शेकडो पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष, सहकारी साखर कारखान्यांचे संचालक, व्यापारी महासंघ पदाधिकारी, वकील, आणि युवक नेत्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, मंत्री मकरंद पाटील, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार मनोज कायंदे, प्रवक्ते आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशामुळे मराठवाडा व विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची घडी अधिक बळकट झाली असून आगामी निवडणुकीत याचा परिणाम दिसून येईल, अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

आणखी वाचा