वरळी डोममध्ये अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली; सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती

मुंबई, दि. २३ : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरळी डोम येथे आयोजित शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. या शोकसभेला राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण केली. उपस्थित सर्व नेत्यांनी त्यांच्या कार्याची, नेतृत्वगुणांची व व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देत भावनिक शब्दांत भावना व्यक्त केल्या.

या शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुशीलकुमार शिंदे, जयंत पाटील, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार तसेच पवार कुटुंबीय आणि सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती. उद्योगपती मुकेश अंबानी व गौतम अदानी यांनीही शोकसभेला हजेरी लावली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “अजित पवार हे अत्यंत कुशल प्रशासक होते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अकरा वेळा अर्थसंकल्प सादर केला असून आर्थिक शिस्त हा त्यांचा स्वभावधर्म होता. कोणतीही फाईल प्रलंबित ठेवायचे नाहीत, त्वरित निर्णय घ्यायचे, ही त्यांची कार्यपद्धती होती. जनतेच्या प्रश्नांवर त्यांची अचूक पकड होती.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, अजित पवार हे स्पष्टवक्ते आणि ठाम निर्णय घेणारे नेते होते. “दादा, देवेंद्रजी आणि माझे परस्परांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. आम्ही एकमेकांच्या मनातील भावना ओळखत होतो. मात्र आज त्यांचं असं अचानक जाणं हा राज्यासाठी मोठा धक्का आहे,” असे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, विधिमंडळातील कामकाजाच्या काळात त्यांच्याशी घट्ट मैत्री निर्माण झाली होती. “लहानसहान विषयांपासून ते मोठ्या विकासकामांपर्यंत प्रत्येक गोष्टीवर त्यांचे सूक्ष्म लक्ष असायचे. जनतेच्या हितासाठी ते नेहमी ठाम भूमिका घ्यायचे,” असे गडकरी म्हणाले.

छगन भुजबळ यांनी “नेहमी वेळेवर पोहोचणारे दादा आज अवेळीच निघून गेले,” अशी भावना व्यक्त करत त्यांच्या निधनाने राज्यभरातील लाखो कार्यकर्ते शोकाकुल झाल्याचे सांगितले. जयंत पाटील यांनी गझलेच्या ओळी उद्धृत करत काव्यात्मक शब्दांत आपल्या भावना मांडल्या.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले की, “गेल्या पन्नास वर्षांपासून माझे अजितदादांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. आज इतकी मंडळी येथे जमली आहेत, हीच मंडळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जमली असती तर अधिक समाधान वाटले असते.”

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले होते. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. वरळी डोम येथे पार पडलेली ही शोकसभा त्यांच्या कार्याला, नेतृत्वाला आणि लोकसेवेला वाहिलेली भावनिक आदरांजली ठरली.

आणखी वाचा