श्रद्धेच्या अफूखाली बधिर झालेला भारत : विज्ञानाचा गळा आवळणारी अध्यात्माची सत्ता

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी हे साईबाबांच्या भक्तीसाठी जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र. श्रद्धा, सबुरी आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या स्थळी दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. अनेक जण पायी पदयात्रा करून आपली दुःखे, व्याधी आणि संकटे दूर होतील या विश्वासाने साईचरणी नतमस्तक होतात. श्रद्धेची ही ताकद नाकारता येणार नाही. मात्र, श्रद्धेच्या आड विज्ञान, तर्क आणि विवेक यांना बाजूला सारले जात असेल, तर त्याचे परिणाम समाजासाठी घातक ठरू शकतात.

२२ ऑक्टोबर २०२५ रोजी शिर्डीतील साईमंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ‘साई सिल्क बिग बाजार’ या दुकानात मध्यरात्री भीषण आग लागली. आगीची तीव्रता इतकी होती की आजूबाजूची अनेक दुकाने तिच्या लपेटीत सापडली आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग नेमकी कशी लागली, याचा शोध घेणे हा ‘बिनडोक प्रश्न’ ठरवला गेला. अखेर मानवाने उभारलेल्या अग्निशमन दलानेच ही आग विझवली. तरीही काही जण हे मान्य करण्याऐवजी ‘ईश्वरी कृपा’ किंवा ‘श्रद्धेची शक्ती’ पुढे करतात. भक्तांनी प्रश्न विचारू नयेत, कारण तो श्रद्धेचा अपमान ठरतो, असा अलिखित नियमच समाजात रूढ झालेला दिसतो.

ही मानसिकता केवळ एका घटनेपुरती मर्यादित नाही; ती आपल्या हजारो वर्षांच्या बौद्धिक प्रवासाचे अपयश दर्शवते. गेल्या दीड हजार वर्षांत जगभरात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वैद्यकशास्त्र अशा अनेक क्षेत्रांत क्रांतिकारी शोध लागले. त्या शोधांवर आधारित तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन अधिक सुरक्षित, समृद्ध आणि सुसह्य झाले. मात्र या शोधयात्रेत भारतीय योगदान अत्यंत मर्यादित राहिले. तरीही “हे सर्व आमच्या ऋषींनी वेदांत आधीच सांगितले होते; पाश्चात्त्यांनी ते चोरले” असा आत्मवंचक दावा केला जातो आणि त्यावर समाधान मानले जाते. ही वृत्तीच खरी राष्ट्रीय शोकांतिका आहे.

इ.स. ५०० नंतर भारतीय समाजाने हळूहळू ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवली. “हे जग मिथ्या आहे, खरे जीवन परलोकात आहे” हा विचार कथा, कीर्तन, प्रवचन आणि पुराणांमधून जनमानसात खोलवर रुजवला गेला. प्रश्न विचारणे, निरीक्षण करणे, प्रयोग करणे आणि कुतूहल बाळगणे—ही विज्ञानाची मूलभूत तत्त्वे खुंटली. इहलोक नको, परलोक हवा या मानसिकतेमुळे भारतीय बुद्धिमत्ता धर्मकथांच्या भोवऱ्यात अडकून पडली.

पाऊस का पडतो? ऋतू का बदलतात? चंद्र पृथ्वीवर का कोसळत नाही? पाणी उताराकडेच का वाहते? असे साधे पण मूलभूत प्रश्न बहुसंख्य समाजाने कधी गांभीर्याने विचारलेच नाहीत. गार्गीसारख्या काही जिज्ञासूंनी हे प्रश्न विचारले, तेव्हा “परमात्मा तसे करतो” एवढ्यावर समाधान मानले गेले. प्रश्नांची उत्तरं दैवी चौकटीत बंदिस्त झाली आणि विचारप्रक्रियाच थांबली. जिथे विचार थांबतो, तिथे शोध जन्माला येत नाही—आणि नेमके हेच भारतात घडले.

न्यूटनने जर आपल्या प्रश्नांची उत्तरे धर्मगुरूंकडून मागितली असती, तर “ईश्वराची लीला” एवढेच उत्तर मिळाले असते. मग गुरुत्वाकर्षणाचा नियम कधी जन्मालाच आला नसता. न्यूटनने श्रद्धेपेक्षा संशय निवडला, निरीक्षण आणि प्रयोगांवर विश्वास ठेवला आणि त्यामुळे संपूर्ण जगाचे वैज्ञानिक आकलन बदलले. आपण मात्र श्रद्धेच्या नावाखाली संशयालाच पाप ठरवले.

भारताने अध्यात्माऐवजी भौतिक संशोधनाला प्राधान्य दिले असते, तर आपल्या तांत्रिक प्रगतीची दिशा किती वेगळी असती, याची कल्पनाच थक्क करणारी आहे. परंतु या देशातील प्रज्ञावंतांची ऊर्जा मोक्ष, ब्रह्मसाक्षात्कार, अद्वैत आणि अदृश्य शक्तींच्या शोधात खर्च झाली. पांडवकाळात ज्या जात्यांवर धान्य दळले जात होते, त्याच साधनांत पेशवाईपर्यंत फारसा बदल झाला नाही. शतकानुशतके तंत्रज्ञानात सुधारणा न होणे हे वैज्ञानिक विचारांच्या अभावाचे स्पष्ट लक्षण आहे.

संत, कवी, अभंग, ओव्या, पुराणे, व्रत-महात्म्ये—हजारो ग्रंथ निर्माण झाले. मात्र या विपुल धार्मिक साहित्यामधून एकाही वैज्ञानिक शोधाचा जन्म झाला नाही. उलट, विज्ञानमूलक विचार दाबला गेला, अध्यात्माला खोटा वैज्ञानिक मुलामा देण्यात आला आणि देशाची प्रगती अडखळली. भारत विज्ञानात मागे पडण्याचे मुख्य कारण म्हणजे मोक्षप्राप्ती, जन्म-मरणाच्या काल्पनिक फेर्‍यांतून सुटका आणि परलोकसाधनेचे वेड.

आजही “विज्ञान मिथ्या, अध्यात्म सत्य” असा ठाम विश्वास अनेकांमध्ये आहे. त्यामुळेच विज्ञान आपल्यापासून दूर पळते. जर २००-३०० किलोमीटर पायी पदयात्रा केल्याने मानवी दुःख संपत असेल, तर मंदिरासमोरील दुकानाला लागलेली आग विझवण्यासाठी मानवानेच का धाव घ्यावी लागली? हा प्रश्न अनवाणी पदयात्रा करणाऱ्या आणि हातात स्मार्टफोन असणाऱ्या तरुणांना का पडत नाही?

हा लेख कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी नाही. श्रद्धा हा वैयक्तिक विषय आहे. मात्र समाजाच्या प्रगतीसाठी विज्ञान, तर्क आणि विवेक अपरिहार्य आहेत. परलोकाच्या ध्यासातून बाहेर येऊन इहलोकातील प्रश्नांची उत्तरे विज्ञानात शोधण्याची वेळ आली आहे. संशय, प्रयोग आणि निरीक्षणाची संस्कृती पुन्हा रुजवली, तरच भारत खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर जाऊ शकतो. काहींना ही वस्तुस्थिती मान्य नसेल; त्यांच्या भावनिक, सामाजिक किंवा आर्थिक हितसंबंधांना ती बाधक ठरत असेल. त्यांनी हा लेख प्रसिद्ध केला नाही, तरी चालेल. पण त्यामुळे सत्य बदलणार नाही. प्रबोधन थांबणार नाही—आणि परिवर्तनही अटळच राहील.

– संपादक

आणखी वाचा