मी पाहिलेले आणि अनुभवलेले ‘दादा’

मी २०१७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पीआरओ म्हणून कामाला सुरुवात केली. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना ‘दादा’ बोलतील तोच फायनल व अंतिम शब्द असायचा… आणि शेवटची बैठक मुंबईत पक्ष कार्यालयात (२७ जानेवारी २०२६) होत असताना सुद्धा तोच अंतिम होता.

मी पक्षाचा पीआरओ झाल्यानंतर पहिलीच यवतमाळ ते नागपूर अशी हल्लाबोल पदयात्रा काढण्यात आली. त्या पदयात्रेत दादांचा अनुभव आला. प्रत्येक कार्यकर्त्याची काळजी घेणारा नेता पाहिला… त्यानंतर विरोधी पक्षात असताना दादांनी राज्यात घेतलेल्या सर्व सभा मी कव्हर केल्या. प्रत्येक सभेत जनतेची नाळ ओळखत आणि त्यांच्याच शब्दात संवाद साधणारा नेता आणि कार्यकर्ता मी पाहिला… सकाळी सहा वाजता किंवा पहाटे दादांचा दौरा सुरू व्हायचा आणि रात्री भेटायला आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याची समस्या जाणून घ्यायची ही त्यांची खासियत होती…त्यामुळेच त्यांचा चाहतावर्ग राज्यात मोठया प्रमाणात होता.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जनता दरबारसाठी येणार्‍या लोकांचे अनेक प्रश्न दादा सोडवायचे… जनता दरबारमधील एक प्रसंग मला आठवतो… एक कार्यकर्ता आपल्या मुलाच्या ॲडमिशनसाठी आला होता पण त्याच्या मुलाला कमी टक्के गुण होते त्यावेळी दादांना तो विनंती करत होता पण दादांनी स्पष्टपणे सांगितले मुलाला कमी टक्के गुण आहेत ‘कसं होईल काम तुझं’ असा दमच दिला… पण जेव्हा दरबार संपला त्यावेळी त्या कार्यकर्त्याला बोलावून त्याचे काम केले…

कधी वडीलकीच्या नात्याने दम देऊन तर कधी हक्काने दरडावत दादा आपल्या पदाधिकाऱ्यांना जपताना मी पाहिले आहेत… दादा म्हटले की गर्दी आलीच हे समीकरण पहायला मिळायचे… मिडियाची गर्दी आणि त्यांना भेटण्यासाठी येणारे कार्यकर्ते यांना समजावून सांगण्यात माझा बराच वेळ जायचा…

दादांचे खूप अनुभव पाठिशी आहेत जे कधीच शब्दात सांगता येणार नाहीत… ते अनुभव… ते प्रसंग आज डोळ्यासमोर तरळत आहेत… ‘दादाचा वादा’ म्हणजे आपले काम होणार याची खात्री राज्यातील प्रत्येक मग तो कुठल्याही पक्षातील कार्यकर्ता असो त्याचे काम हमखास होत होते… राज्याचा अर्थसंकल्प मांडताना दादांनी रेकॉर्ड मोडला होता तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणूनही रेकॉर्ड केला होता…

दादांची शिस्त म्हणजे एकदम कडक होती… दादा पक्ष कार्यालयात येणार हे समजल्यावर आमची होणारी सर्वांची धावपळ असो किंवा कार्यकर्त्यांची हा वेगळाच अनुभव असायचा… दादांनी मिडियाशी बोलले पाहिजे असे मिडियाकर्मी मला सांगायचे पण मी त्यांना सांगायचो ‘दादा आपल्या कामाने दिसतात’ हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे… दादा असतील तिथे मिडियाची गर्दी पहायला मिळायची… मात्र दादा बोलतील याची माहिती नसायची… दादा निघताना मिडियाने काही प्रश्न विचारला तर म्हणायचे काय बोलू… मी माहिती घेऊन बोलतो… किंवा त्यांना बोलायचे त्यावेळी ते जवळपास अर्धा ते पाऊण तास मिडियाशी बोलायचे…

बीड जिल्ह्यातील एक घटना या ठिकाणी सांगतो.. दादांना भेटायला एक कुटुंब आलं होतं त्यांच्या मुलाची बीएमएसची फी भरायला पैसे नव्हते… फी भरायला नसल्याने त्या मुलाला कॉलेज सोडावे लागणार होते. म्हणून ते कुटुंब दादांना भेटायला मंत्रालयात आले मात्र त्यांना मंत्रालयात जाता न आल्याने मंत्रालयासमोर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात ते येऊन थांबले. तिथे दादा आले पण त्यांना भेटण्यासाठी प्रचंड गर्दी होती. ते कुटुंब दादांना कसं भेटणार या विवंचनेत असताना त्या कुटुंबाला दादांची भेट घालून दिली. दादांनी तात्काळ त्या कॉलेजच्या प्रशासनाला कॉल करुन त्या मुलाच्या शिक्षणाची संपूर्ण फी भरण्याचे आश्वासन दिले. तेव्हा त्या कुटुंबाचा आनंद बघण्यासारखा होता त्यावेळी मी माझ्या फेसबुकवर ‘दादा तुस्सी ग्रेट हो’ अशी पोस्ट लिहिली होती… असे असंख्य प्रसंग आणि घटना आहेत ज्या दादांच्या रुपाने अनुभवायला मिळाल्या.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात… प्रशासनावर जरब असणारे कणखर नेतृत्व… आणि जनसामान्यांचे लाडके दादा… दादा म्हणजे पहाटेच्या वेळी कामाला सुरुवात करणारा हा ‘लोकाभिमुख’ नेता… बारामतीपासून मंत्रालयापर्यंत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या दादांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. सडेतोड बोलणे आणि दिलेला शब्द पाळणे ही त्यांची ओळख महाराष्ट्राच्या राजकारणात सदैव अजरामर राहील…दादा म्हणजे शिस्त… स्पष्टवक्तेपणा आणि अहोरात्र कष्ट करण्याची तुमची वृत्ती आम्हा सर्वांसाठी कायम प्रेरणादायी असेल. राज्याच्या विकासातील तुमचे योगदान कधीही विसरता येणार नाही.

शिस्तप्रिय… कणखर नेतृत्व… लोकनेता दादा… हळवा माणूस…स्वच्छतेच्या बाबतीत तडजोड नाही… जे दादा मी गेल्या ८-९ वर्षात अनुभवले त्यामुळे ‘असा दादा माणूस होणे नाही’ … आज आम्ही खरंच पोरके झालो…

– संदीप कांबळे
मिडिया समन्वयक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

आणखी वाचा