रत्नागिरी: कोकणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्करराव जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघात ठाण मांडून प्रचारात सक्रिय झाले आहेत. प्रचार सभांच्या मालिकेत त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने १९९५ साली आपल्याला पहिल्यांदा उमेदवारी कशी मिळाली, याचा भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा किस्सा उलगडून सांगितला.
भास्करराव जाधव म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मला राजकारणाची मूलभूत शिकवण दिली. “समाज किती मोठा आहे यापेक्षा कार्यकर्ता किती प्रामाणिक आहे, लढवय्या आहे की नाही हे महत्त्वाचं. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं,” हा बाळासाहेबांचा विचार माझ्या आयुष्याची दिशा ठरवणारा ठरला.
१९९५ साली रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने पाच जागा लढवल्या, त्यापैकी दोन जागा भाजपाला देण्यात आल्या. त्या वेळी तीन आमदार मराठा समाजाचे निवडून आले होते, राजापूरमध्ये पुन्हा मराठा समाजातून आप्पा साळवी यांना उमेदवारी देण्यात आली होती, तर चिपळूणचे कै. बापूसाहेब खेडेकर हे ओबीसी समाजाचे आमदार होते. उमेदवारीच्या बैठकीत मनोहर जोशी बाळासाहेबांना सांगत होते की, ओबीसी समाजाचा निवडून आलेला उमेदवार डावलून भास्कर जाधवला तिकीट दिल्यास पाचही उमेदवार मराठा समाजाचे होतील आणि इतर समाज नाराज होतील.
यावर बाळासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, “पंत, भास्कर जाधव कार्यकर्ता आहे की नाही?” त्यावर मनोहर जोशी म्हणाले, “रत्नागिरी जिल्ह्यात भास्कर जाधवसारखा लढवय्या, अभ्यासू आणि संघर्ष करणारा कार्यकर्ता नाही.” हे ऐकल्यानंतर बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले, “आज संध्याकाळी मी भास्करच्या नावाची घोषणा करणार.”
पुन्हा एकदा शंका व्यक्त होताच बाळासाहेब म्हणाले, “मला सत्ता हवी आहे, पण कोणाची जात पाहून मी कार्यकर्त्याचा गळा मारणार नाही.” हा प्रसंग आजही मनात कोरलेला आहे, असे भास्कररावांनी सांगितले.
याच विचारधारेवर मी गेली ४२ वर्षे राजकारण केले. कुणबी-मराठा समाजाबरोबरच लहान समाजांना, बहुजनांना संधी दिली. धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती उभी केली, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. “त्यांना निवडणुकाच घ्यायच्या नव्हत्या, पण घ्याव्या लागल्या. उद्या काय होईल सांगता येत नाही. मशीनमध्ये घोटाळा होईल, लोक विकत घेतले जातील अशी भीती आहे; पण भीती बाळगून घरी बसून चालणार नाही. आपल्याला लढावंच लागेल,” असे आवाहन करत भास्करराव जाधव यांनी भाजपावर घणाघाती टीका केली.








