मुंबई विमानतळावरील ५ कोटींच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी भाजप पदाधिकारी अटकेत; राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण

सोनं तस्करी करणारा भाजपा नेता- संजय राऊत

मुंबई, दि. ०७ : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याच्या तस्करीप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत भाजपाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या एका पदाधिकाऱ्यासह सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत ५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोनं आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये अजित आचरेकर याचा समावेश असून तो अखिल भारतीय कामगार संघटनेचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्याचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता, असे सांगितले जात आहे.

डीआरआयच्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयास्पद हालचालींवर नजर ठेवून अजित आचरेकर, रोहित कुमार सिंग, संतोष सुभाष, समीमुल्ला शहा, हमीद लेबेरीफखान आणि फलिल मोहम्मद कासिम या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान दोन श्रीलंकन आणि एका बांगलादेशी नागरिकाने शरीरात लपवून सोन्याची पावडर भारतात आणल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या सोन्याबाबत कोणतेही वैध कागदपत्र आढळून न आल्याने सर्व आरोपींवर कस्टम्स कायदा १९६२ च्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार टीका केली आहे. राऊत यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये भाजपच्या काही नेत्यांवर गंभीर आरोप करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली.

याला भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. “अटक झालेल्या व्यक्तीचा भाजपाशी कोणताही संबंध नाही. भाजपाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला अटक झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करी रॅकेटचा संबंध आहे का, तसेच इतर प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग आहे का, याचा डीआरआयकडून तपास सुरू आहे. न्यायालयात आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा