राष्ट्रवादीचं ठरलं! सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार; उद्या शपथविधी

राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार सुनेत्रा पवार

मुंबई, दि. ३० : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीवर अखेर तोडगा निघाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होणार असून या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पक्षाला एकसंघ ठेवण्यासाठी आणि पवार कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीकडे सूत्रे सोपवावीत, अशी भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आणि पक्षातील महत्त्वाची जबाबदारी देण्यावर एकमत झाले आहे.

पक्षाकडून होत असलेल्या सातत्यपूर्ण आग्रहानंतर सुनेत्रा पवार यांनी अखेर उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास संमती दिल्याचे समजते. अजित पवार यांच्या जाहिरात व जनसंपर्क कामकाजाशी संबंधित असलेल्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाले असून, वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय अंतिम करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम झाल्यानंतर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या पाच वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविण्यात येणार असून, त्यांच्या उपस्थितीत शनिवारी संध्याकाळी शपथविधी होणार आहे.

सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यास त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्याकडे असलेली अर्थखाते, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क ही महत्त्वाची खाती कुणाकडे जाणार, यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. विशेषतः अर्थखाते राष्ट्रवादीकडेच ठेवण्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यात बंद दाराआड तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ चर्चा झाल्याचे समजते.

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाला एकत्र ठेवणे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस नव्या राजकीय टप्प्यात प्रवेश करणार असून, महायुतीतील सत्तासमीकरणांवरही या निर्णयाचा परिणाम होणार आहे.

उद्या होणाऱ्या शपथविधीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती दिली जाणार आणि अर्थखात्याबाबत अंतिम निर्णय काय होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रित झाले आहे.

आणखी वाचा