खेरशेत येथे यशोधरा महिला मंडळाच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा

सावर्डे, दि. २९ : खेरशेत (ता. चिपळूण) येथील तक्षशिला बुद्ध विहारामध्ये यशोधरा महिला मंडळाच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाला यावर्षी ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

महिला सबलीकरणाचा वारसा जपत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला हक्क, अधिकार आणि स्वावलंबन दिले. आजची स्त्री स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक आहे, हे केवळ संविधानदात्या बाबासाहेबांमुळे शक्य झाले, असा भावपूर्ण उल्लेख यावेळी करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस यशोधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा उपासिका शैला बाळाजी कदम यांनी पुष्पहार अर्पण करून झाली. तर भारतीय संविधानाच्या प्रतिमेला ज्येष्ठ उपासिका जयश्री कदम यांनी हार अर्पण करून आदर व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासिका मनाली कदम (आशा सेविका) यांनी केले. त्यांनी संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान प्रभावीपणे मांडले. त्यानंतर उपासिका संघरक्षिता कदम (अंगणवाडी सेविका) यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून सर्वांना एकात्मतेचा संदेश दिला.

यशोधरा महिला मंडळ गेली दोन वर्षे भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महिलांच्या पुढाकारातून साजरी करत आहे. महिलांद्वारे आयोजित हा उपक्रम तालुका, जिल्हा आणि राज्यासाठी आदर्शवत ठरत असल्याचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपासिका प्रज्ञा कदम (उपाध्यक्षा), करुणा कदम (संदेशवाहक), श्रीमती अनिता कदम, प्रियांका कदम, प्रार्थना मोहिते, मंदा कासारे, प्रणाली कदम, वैशाली कदम आणि कु. सृष्टी कदम यांनी परिश्रम घेतले.

या संविधान दिन कार्यक्रमाबद्दल मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंचाचे मुख्य प्रवर्तक संजय शांताराम कदम यांनी दूरध्वनीद्वारे महिला मंडळाचे अभिनंदन करून पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

आणखी वाचा