रविवारी चिपळूणच्या धामणवणेत ‘बांधावरचे संमेलन’

मराठी साहित्य क्षेत्रातील पहिल्याच अभिनव प्रयोगाची राज्यभर उत्सुकता

चिपळूण, दि. ५ : ‘माणूस, माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास’ या बोधवाक्याखाली आयोजित करण्यात आलेले आणि राज्यभर उत्सुकतेचा विषय ठरलेले ‘बांधावरचे संमेलन’ येत्या रविवारी (दि. ८) चिपळूण नजीकच्या धामणवणे येथील विठ्ठलाई मंदिराजवळील ‘साद मयुराची’ शिवारात संपन्न होणार आहे. शेणाने सारवलेल्या शेताच्या बांधावर दीपप्रज्वलन, सातेरी माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वारुळांचे पूजन तसेच पवित्र गंगेच्या मातीने भरलेल्या घटाचे पूजन करून सकाळी ९.४५ वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

संमेलनाची नावनोंदणी व अल्पोपहार सकाळी ९ ते ९.४५ या वेळेत होणार आहे. प्रा. सुहास बारटक्के हे संमेलनाध्यक्ष असून शशिकांत मोदी स्वागताध्यक्ष आहेत. उद्घाटन डॉ. प्रशांत पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शेखर निकम, महाराष्ट्र साहित्य परिषद (केंद्रीय) उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी उद्योग समूहाचे प्रवर्तक प्रशांत यादव उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सत्र (स. ९.४५ ते १०.४५) मध्ये मसाप (केंद्रीय) कोकण प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, कोमसाप जिल्हाध्यक्ष आनंद शेलार, केशवसुत स्मारकाचे विश्वस्त गजानन पाटील, डॉ. यतीन जाधव, सुभाष लाड, मदन हजेरी, विलास कुवळेकर, राजेंद्र आरेकर, अरविंद कुलकर्णी, कैलास गांधी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. संचालन प्रा. सोनाली खर्चे व धीरज वाटेकर करतील.

विविध सत्रांचे आयोजन
पहिले सत्र (स. १०.४५ ते ११.४५) ‘कविता : तंत्र आणि मंत्र’ या विषयावर होणार असून अभ्यासक विजय जोशी मार्गदर्शन करतील. सत्रसंचालन मनीषा दामले व प्रकाश घायाळकर करतील.

दुसरे कथाकथन सत्र (स. ११.४५ ते १२.३०) मध्ये विविध बोलीभाषांतील कथा सादर केल्या जातील. यात सुरेश देशपांडे (प्रमाण मराठी), उज्ज्वला मांडवकर (संगमेश्वरी), अमोल पालये (तिलोरी), अतुफा होडेकर (कोकणी) व ज्ञानेश्वर झगडे (खारवी) सहभागी होणार आहेत. संचालन संगीता जोशी, विशाखा चितळे, ऋचा भागवत व उमेश घाडगे करतील.

भोजनानंतर तिसरे सत्र ‘शेतीची गाणी’ (दु. २ ते ३) या विषयावर होणार असून संध्या आठल्ये व विनायक ओक संचालन करतील. चौथे सत्र (दु. ३ ते ३.४५) संमेलनाध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांच्या मुलाखतीचे असेल. ही मुलाखत स्नेहल जोशी व मंगेश बापट घेणार आहेत.

यानंतर चहापान व पारंपरिक शाकाहारी मोंगा-पोपटीचा आस्वाद घेता येणार आहे. दु. ४ ते ५ या वेळेत नामवंत कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. यात राज्यभरातील अनेक नामवंत कवी सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप सायंकाळी ५ ते ५.४५ या वेळेत होणार आहे.

अभिनव साहित्यिक प्रयोग
निसर्गाच्या कुशीत, काजूच्या झाडांच्या छायेत, शेताच्या बांधावर बसून होणारे हे संमेलन मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग ठरत आहे. कोणताही मंडप, स्टेज किंवा खुर्च्या न वापरता जमिनीवर बैठक मारून साहित्यिक संवाद, अल्पोपहार, भोजन आणि चहापानाची ग्रामीण कोकणी पद्धतीची व्यवस्था करण्यात आली आहे. गाव आणि शहराच्या सीमा पुसून सर्व लिहित्या हातांना आणि गाणाऱ्या मनांना एकत्र आणणे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे.

आयोजन
संमेलनाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने करण्यात आले असून सहआयोजक म्हणून कोकण मराठी साहित्य परिषद व साहित्य भारती शाखा चिपळूण सहभागी आहेत. संयोजन समितीचे कार्याध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर, सहकार्यवाह प्रा. सोनाली खर्चे यांच्यासह अनेक साहित्यप्रेमी कार्यकर्ते संमेलनाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

आणखी वाचा