समाजातील महिलांविषयीची विकृत मानसिकता बदलली पाहिजे – महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव

चिपळूण, दि. ०२ (प्रतिनिधी)::  समाजात सद्यस्थितीत वावरताना आजची मुलगी किंवा महिला सुरक्षित नाही. देशभरात महिलांवरच्या अत्याचार बलात्कार यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे असुरक्षितपणा महिलांच्या मध्ये निर्माण होत आहे.  यासाठी मोर्चे आंदोलने किंवा प्रतिकात्मक निषेध करून काहीच होणार नाही.  यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची मानसिकता किंवा विचारसरणी बदलली तर निश्चितच  हिंसाचार आणि अत्याचार  या घटनांमध्ये बदल घडवून येऊ शकतो, असे मत महिला संरक्षण अधिकारी माधवी जाधव यांनी व्यक्त केले. 
चिपळूण  शहरातील परकार कॉम्प्लेक्स येथे महिला संरक्षण अधिकारी कार्यालयामध्ये मुली व महिला यांच्यावर  होणाऱ्या अत्याचाराबाबत एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  या चर्चासत्रामध्ये त्यांनी महिलांना  मार्गदर्शन  केले.  कार्यक्रमात पुढे त्यांनी सांगितले की,  सद्यस्थितीमध्ये हिंसाचार व अत्याचार यात वाढ होत आहे. घरातून बाहेर पडणारी मुलगी किंवा काम करणारी महिला संध्याकाळी घरी सुरक्षित येईपर्यंत घरच्या व्यक्तींच्या जीवात जीव नसतो.  एवढी असुरक्षितता आज देशभरात निर्माण झाली आहे.  या मागची नेमकी कारण काय हे सुद्धा शोधने  फार गरजेचे आहे.  महिलांबाबत ज्या घटना आतापर्यंत घडल्या आहेत त्या खरच निंदनीय आहेत.
मात्र अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी समूपदेशन फार महत्त्वाचे  आहे. मुलींच्या बाबतीत विचार केला तर शाळेत शारीरिक शिक्षणाचा किंवा खेळाचा तास असतो.  किमान आठवड्यातून एकदा एक तास स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ठेवून  गरजेचे आहे.  मुलींना स्वसंरक्षण कसे करणे याबाबत मार्गदर्शन दिले तर निश्चितच त्यांच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो असे त्यांनी बोलताना सांगितले.  त्याचबरोबर कायद्यामध्ये सुधारणा करणे तेवढे लगेच शक्य होणार नाही. मात्र प्रत्येक व्यक्तीने आपली विचारसरणी बदलली तर निश्चितच या विकृत मानसिकतेला आळा बसू शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित अनेक महिलांनी  सुद्धा आपले यासंदर्भातले मत व्यक्त केले. त्यांनीही या अत्याचार आणि हिंसाचार  याबद्दल माहिती दिली. या चर्चासत्राला एकात्मिक बाल विकास प्रकल्प १ च्या शर्वरी सावंत,  प्रकल्प दोन च्या प्रीती शिवगण,  पुनम प्रभावळे, माजी नगरसेविका अदिती देशपांडे,  रीहाना बिजले,  दीपिका कोतवडेकर, नेत्रा पाटील,  डॉ.  श्रुतिका कोतकुंडे,  रेहमत जबले, श्रद्धा जाधव,  स्नेहल चव्हाण आणि  मीनल गुरव अशा अनेक महिला या चर्चासत्राला उपस्थित होत्या.

आणखी वाचा