सिडकोच्या १६,८७६ घरांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” योजनेसाठी पर्याय निवडीस मुदतवाढ

नवी मुंबई, दि. २७ : सिडको महामंडळतर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या गृहनिर्माण योजनेत नागरिकांना पर्याय निवडीसाठी १९ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. योजनेला नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी एकूण १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उभारण्यात येणाऱ्या या गृहसंकुलांना रेल्वे, महामार्ग व मेट्रोद्वारे उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना सोयीस्कर आणि आधुनिक शहरी जीवनशैलीचा लाभ होणार आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी तसेच पसंतीचे पर्याय निवडण्यासाठी अंतिम तारीख १९ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक नागरिकांनी अर्ज नोंदणीसाठी सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळ www.cidcohomes.com
ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

योजनेसंदर्भातील अधिकृत व अद्ययावत माहिती सिडकोकडून वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या पत्रकांद्वारे तसेच अधिकृत समाजमाध्यमांवरून दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अप्रमाणित माहिती किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही सिडकोने स्पष्ट केले आहे.

मुदतवाढीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावे आणि नवी मुंबईतील आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करावे, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

आणखी वाचा