कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका महायुतीच काबीज करणार – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. १३ : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचाच महापौर होईल आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका महायुतीनेच काबीज करायची आहे, असा ठाम निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन, मालकी हक्काचे पट्टे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या ३०–४० वर्षांपासून झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे मिळावेत यासाठी संघर्ष सुरू होता. २०१९ पर्यंत पट्टेवाटपाची प्रक्रिया सुरू होती, मात्र त्यानंतर ती थांबली. आता पुन्हा सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व अडथळे दूर करून झोपडपट्टीधारकांना जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज एकाच दिवशी एक हजार लाभार्थ्यांना मालकी पट्टे देण्यात आले असून, याचा लाभ सुमारे अडीच लाख नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर मॉडेलचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, हा निर्णयाचा शासन आदेश (जीआर) आता संपूर्ण महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. एमएमआर परिसरापुरतेच नव्हे, तर राज्यातील जिथे-जिथे झोपडपट्ट्या आहेत, तिथे ही योजना राबवली जाणार आहे. कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्के घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल. या योजनेत सुमारे ५० हजार लाभार्थी अपेक्षित असून, आतापर्यंत २५ हजार नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. हे मालकी पट्टे बँकेबल असल्याने कर्ज घेण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, भाजप स्वबळावर लढल्यास अधिक जागा मिळतील, असे कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवून विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे महायुतीचा निर्णय घेतला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जागावाटपावर बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप हा महत्त्वाचा पक्ष असून, अद्याप कोणतीही विशिष्ट मागणी करण्यात आलेली नाही. मागील निवडणुकीत भाजपला ४२ जागा मिळाल्या होत्या. शिवसेना आणि भाजप हेच तेथील प्रमुख पक्ष असून, जागावाटप आपसात चर्चा करून केले जाईल. जिंकणे हाच आमचा एकमेव फॉर्म्युला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हुशार पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या योजनांबाबत त्यांची चिंता रास्त आहे. एकाच कुटुंबातील अनेकांनी लाभ घेतल्यास इतर गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो, त्यामुळे यावर योग्य निर्णय घेतला जाईल.

प्रियांका गांधी आणि मनरेगा विषयावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सकारात्मक बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केले असून, ग्रामविकास आणि रोजगारनिर्मितीत त्याचा मोठा फायदा होणार आहे.

राज ठाकरे यांनी बेपत्ता मुलींबाबत लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ते पत्र अद्याप वाचलेले नाही. मात्र, वर्षभरात सुमारे ९० टक्के बेपत्ता मुली सुरक्षितपणे परत आणल्या जातात. पत्र वाचल्यानंतर त्यातील शंकांना उत्तर दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा