नवी दिल्ली, दि. ६ : सोशल मीडियाच्या माध्यमातून उदयास आलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (सीजेपी) या युवा चळवळीने शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पहिले मोठे आंदोलन करत राष्ट्रीय स्तरावर लक्ष वेधून घेतले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात देशभरातून आलेले युवक, विद्यार्थी आणि समर्थक सहभागी झाले होते. दिवसभर घोषणाबाजी, भाषणे आणि चर्चांनी जंतर-मंतर परिसर दणाणून गेला. आंदोलनाची सांगता करताना सीजेपीने केंद्र सरकारला ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून मागण्या मान्य न झाल्यास पुढील टप्प्यात देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके हे शनिवारी सकाळी अमेरिकेतून दिल्लीत दाखल झाले. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे समर्थकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. विमानतळावरून ते थेट जंतर-मंतर येथे पोहोचले. यावेळी त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक आणि भारतीय संविधानाची प्रत होती. आंदोलनाची सुरुवात करताना त्यांनी लोकशाही मार्गाने आणि शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले.


जंतर-मंतरवर सकाळपासूनच मोठ्या संख्येने युवक जमा होऊ लागले. अनेकांनी झुरळांचे मुखवटे, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे लोगो असलेले टी-शर्ट आणि विविध मागण्यांचे फलक हातात घेतले होते. काही आंदोलक हातात पुस्तके आणि तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थीही पालकांसोबत आंदोलनात सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेविरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी अभिजीत दीपके यांनी सरकारवर टीका करत म्हटले की, “आम्ही गेल्या महिनाभरापासून सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवत आहोत. मात्र, आमच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी आमची खाती बंद करणे आणि पोस्ट्स हटविण्यावर भर दिला जात आहे. तुम्ही आमच्या पोस्ट्स हटवू शकता, पण आम्हाला या लढ्यातून हटवू शकत नाही.” त्यांच्या या विधानाला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही भेट देत पाठिंबा दर्शविला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संवाद होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनीही आंदोलनाला संबोधित करत शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली.
दरम्यान, आंदोलनादरम्यान काही विरोधकांनीही जंतर-मंतर परिसरात प्रवेश करून आंदोलनावर टीका केली. एका व्यक्तीने हातात ‘हिट’ स्प्रे घेऊन आंदोलनस्थळी येत प्रतीकात्मक निषेध नोंदवला. त्यामुळे काही काळ वातावरण तापले. मात्र, दिल्ली पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. इंदिरा गांधी विमानतळ, रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि दिल्लीच्या सीमांवर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. जंतर-मंतर परिसरात आणि संवेदनशील भागांमध्ये हजाराहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, अभिजीत दीपके यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत दुपारीच आंदोलनस्थळ सोडले. त्यानंतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी संवाद साधत आंदोलनाची सांगता जाहीर केली. यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी ७ दिवसांच्या आत राजीनामा द्यावा, अन्यथा १३ जून रोजी पुन्हा जंतर-मंतरवर मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
या आंदोलनावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवकांच्या भावना समजून घेण्याची गरज असल्याचे म्हटले. “नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य प्रभावित झाले आहे. त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते रोहित पवार यांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणी केली.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर कठोर टीका केली. “ही युवकांची अभिव्यक्ती नसून अराजकता पसरवण्याची मानसिकता आहे. संविधान हातात घेऊन संविधानिक संस्थांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.
पहिल्याच आंदोलनात मिळालेल्या प्रतिसादामुळे ‘कॉकरोच जनता पार्टी’ची देशभरात चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियातून सुरू झालेली ही चळवळ प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याने येत्या काळात तिचा प्रभाव किती वाढतो, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








