देवदासी प्रथा म्हणजे ‘देवाची दासी’ किंवा ‘देवाला अर्पण केलेली स्त्री’, जिथे लहान मुलींना मंदिरात देवाची सेवा करण्यासाठी आणि धार्मिक विधींमध्ये नृत्य करण्यासाठी समर्पित केले जात असे, पण कालांतराने ही प्रथा लैंगिक शोषणाचे एक रूप बनली, जिथे या स्त्रिया ‘यजमाना’साठी लैंगिक गुलामीत ढकलल्या जात, खासकरून कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात.
प्रथेचे स्वरूप :
धार्मिक समर्पण : मुलींना अपत्यप्राप्तीसाठी किंवा नवस म्हणून लहान वयातच देवाला अर्पण केले जायचे, जणू त्यांचे लग्नच देवासोबत होत आहे.
सेवा : सुरुवातीला या मुली मंदिरातील पूजा, नृत्य आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेत असत.
शोषण: हळूहळू, ही प्रथा मंदिराच्या पुजारी आणि गावातील प्रभावशाली लोकांकडून लैंगिक शोषणासाठी वापरली जाऊ लागली, जिथे त्या ‘यजमाना’च्या लैंगिक गरजा पूर्ण करण्यास बाध्य होत्या.
आर्थिक अवलंबित्व: या स्त्रियांचे जीवन धार्मिक कार्यक्रमांवर आणि यजमानांच्या आधारावर अवलंबून होते, त्यांना सामाजिक आणि आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागत होता.
अपत्यप्राप्तीकरिता किंवा अपत्य जगण्याकरिता पहिले मूल देवाला वाहण्याचा नवस करीत. प्राचीन भारतात पूजेच्या वेळी देवतेला फुले, धूप, धान्य, शिजविलेले अन्न, पेय इ. अर्पण करण्यात येई. ईश्वराने भौतिक सुखांचाही उपभोग घ्यावा, असेही मानले जाई. म्हणून देवतेसमोर नृत्य करण्याकरिता व गाणे म्हणण्याकरिता त्याचप्रमाणे देवतेकरिता होणाऱ्या समारंभात भाग घेण्याकरिता सुंदर मुली ईश्वराला अर्पिल्या जात. पुराणांनी या दृष्टिकोनास पुष्टी दिली. देवाची पत्नी म्हणून मुलींना देण्यात येई. काळाच्या ओघात पुजाऱ्यांनी त्यांचा आपल्या विषयोपभोगाकरिता उपयोग केला. जुन्या ग्रीक लोकांतही त्याचप्रमाणे बॅबिलोनियातील ईस्टर मंदिरातही अशीच प्रथा असलेली दिसून येते. बॅबिलोनियातील प्रत्येक स्त्रीने एकदा तरी ॲफ्रोडाइटीच्या मंदिरात प्रथम चांदीचे नाणे देणाऱ्या पुरुषाशी मंदिराबाहेर जाऊन संग करून त्यास तृप्त केले म्हणजे देवी प्रसन्न होते, अशी त्यांची समजूत असल्याचे हिरॉडोटसचे म्हणणे आहे.
मंदिरात सकाळ–संध्याकाळ दोन्ही वेळी नृत्य करणे व गाणे म्हणणे, त्याचप्रमाणे सर्व सार्वजनिक समारंभांत भाग घेणे, ही देवदासींची अधिकृत कर्तव्ये आहेत. त्यांना विवाहसमारंभाच्या वेळी व इतर धार्मिक कौटुंबिक मेळाव्यास बोलावण्यात येई. त्या काळात वाचन, नृत्य व गाणे शिकण्याचा विशेष अधिकार असणाऱ्या ह्याच एकमेव स्त्रिया होत्या.देवदासींना मंदिराकडून ठराविक रक्कम मिळे. केव्हा केव्हा मंदिराशी संलग्न असलेली जमीन देवदासींना उदरनिर्वाहाकरिता देण्यात येई. देवदासीच्या मुलीला आईकडून वारसा मिळे आणि तीसुद्धा देवदासी बने, तर मुलगा मंदिराचा गवई वा वादक बने. मंदिराच्या नृत्यांगना अत्यंत लावण्यपूर्ण असत. त्या सुगंधी द्रव्य वापरीत, सुंदर पोशाख आणि सुवासिक फुलांनी सुशोभित असलेली केशभूषा करीत, रत्नांचे व सोन्याचे दागिने वापरीत व पुरुषवर्गास कुशलतेने आकर्षित करीत. ज्यावेळी त्या वेश्या बनल्या, त्यावेळी त्यांची प्रतिष्ठा घसरली. सामान्यपणे देवदासींना विवाह करण्यास परवानगी नसते.
दक्षिण भारतात नवव्या –
दहाव्या शतकांत मंदिरे उभारण्याचे कार्य चालू होते. त्या काळात पुष्कळशा देवदासींना भरती करण्यात आले. त्यांना मूर्तीला चामराने वारा घालणे, कुंभारतीची पवित्र ज्योत नेणे तसेच मिरवणुकीच्या वेळी ईश्वरासमोर नृत्य–गान करणे, अशा प्रकारची कामे करावी लागत. मदुरा, कांजीवरम् व तंजावर येथील मंदिरांत अनेक देवदासी होत्या. त्या ठिकाणच्या मोठ्या मंदिरांच्या स्थायी दानातून त्यांना भत्ता मिळत असे.
कर्नाटक
कर्नाटकात देवदासी ‘बसवी’ म्हणून ओळखली जाते. बसव्या म्हणून देवदासींना अर्पण करणे, विशेषतः लिंगायत व होलेया लोकांत प्रचारात होते. त्यांना वारांगना म्हणून राहावे लागत असे. लिंगायत बसव्यांना स्थलनामाव्यतिरिक्त आडनाव नसे. बसवेश्वर व मल्लिकार्जुन हे त्यांचे देव होते. त्यांची मुख्य कामे जातीच्या बैठकीला, विवाहाला आणि इतर समारंभांना उपस्थित राहणे, धार्मिक विधी आचरण्यात स्त्रियांना मदत करणे व वधूवरांना आरती ओवाळणे अशा प्रकारची होती. बसव्यांना आपल्या मातापित्यांकडून धनाचा वारसा मिळे. कर्नाटकात बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती येथे दर पौर्णिमेला देवदासींची जत्रा भरते. त्यात माघी पौर्णिमेला (रांड पुनव) मोठी जत्रा भरते. जत्रेत यल्लमा देवतेला मुली वाहण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. या देवदासींना ‘जोगतिणी ’ म्हणतात. केस गुंतल्यावर (‘जट’ आल्यावर) तो देवीचा कोप मानून ती मुलगी देवीला वाहण्यात येते. या जोगतिणी गळ्यात मण्यांच्या किंवा कवड्यांच्या माळा घालतात, डोक्यावर ‘जग’ (देवीचा पितळी मुखवटा ठेवलेली परडी) वाहून नेतात व कपाळावर भंडारा लावतात. चोंडक, टाळ व तुणतुणे यांच्या साथीने त्या देवतेच्या स्तुतिपर गाणी गातात. त्या उपजीविकेकरिता जोगवा मागतात. काळाच्या ओघात बहुतेक जोगतिणींना वेश्याव्यवसाय पतकरणे भाग पडले; तो त्यांच्यावर समाजाकडून लादला गेला, असे दिसून येते.
महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये खंडोबाला मुरळी म्हणून मुली वाहिल्या जातात. पुरुष वाघ्या म्हणून ओळखले जातात. मुरळी नाचते, तर वाघ्या गाणे गातो व तुणतुणे वाजवतो. ते जागरणाचा विधी करतात. तमाशा आणि ग्रामीण नाटके यांतही ते कामेही करतात. काही मुरळ्याही वेश्याजीवन पत्करतात. कदंब अंमलात गोव्यात मंदिरे बांधण्यास सुरुवात झाली. अशा तऱ्हेने बौद्ध काळापासून गोव्यात देवदासी होत्या. सुरूवातीला देवदासी ईश्वरस्तुतिपर गाणे गात, उपवास करीत आणि ईश्वराच्या वार्षिक समारंभाच्या वेळी फक्त भाग घेत. परंतु हळूहळू त्या नृत्य करणाऱ्या व गाणाऱ्या मुली बनल्या. त्या फक्त धार्मिक समारंभातच भाग घेत नसत, तर सामाजिक समारंभातही भाग घेत. राजमहालाशीही त्यांचा नर्तकी म्हणून संबंध असे. देवदासी अर्पण करण्याचा समारंभ ‘शेंस’ विधी म्हणून ओळखला जाई. शेंस विधी हा लग्नसमारंभासारखाच असे. फरक फक्त इतकाच, की वर म्हणून पुरुषवेषातील मुलगी असे. केव्हाकेव्हा लग्न हे एका तलबारीशी किंवा कट्यारीशी होत असे. काळाच्या ओघात त्या रखेल्या म्हणून राहत. त्यांना नृत्य–गायनाचे विशेष शिक्षण देण्यात येत असे. त्यांच्यापैकी काही यशस्वी आकाशवाणी गायिका, चित्रतारका व नाट्य–अभिनेत्री झाल्या. अशा तऱ्हेने देवदासींचे दोन गट पडले : कलांवतिणी वा नायकिणी आणि भाविणी. पुरुष हे नाईक आणि देवली म्हणून ओळखले जात. कलावंतिणी गायिका व नर्तकी असत. साधारणतः त्या रखेल्या म्हणून राहत. भाविणींपेक्षा त्यांचा दर्जा वरचा असे. भाविणी कमी शिकलेल्या असत व नृत्य–गायनात प्रवीण नसत. त्या मंदिरांची झाडलोट करीत, दिवे लावीत व ईश्वराच्या पूजेत भाग घेत. त्या पुष्कळदा वेश्याव्यवसाय करीत. महाराष्ट्र राज्यात रत्नागिरी जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये भाविणी आढळून येत. देवदासींना त्यांच्या उपजीविकेकरिता मंदिराची जमीन देत
देवदासी प्रथा निर्मूलन प्रयत्न :
मद्रास देवदासी (समर्पण प्रतिबंध) कायदा (१९४७) सारख्या कायद्यांनी या प्रथेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केला. देवदासी प्रथा बंद करण्याचा प्रथम प्रयत्न त्यावेळच्या म्हैसूर संस्थानाने १९१० साली एक कायदा करून केला. नंतर त्यावेळेच्या मुंबई प्रांताने १९३४ साली व मद्रास प्रांताने १९४७ साली अशाच प्रकारचे कायदे केले. १९७५ साली गडहिंग्लज येथे ‘म. फुले समता प्रतिष्ठान’ तर्फे देवदासी भगिनी परिषद भरविण्यात आली होती. निरनिराळ्या राज्यांनी देवतेला मुली वाहण्यास प्रतिबंध करणारे असे कायदे जरी केले असले, तरी देवदासी प्रथा पूर्णतया बंद झालेली नाही.
देवदासी प्रथा निर्मूलन साठी महाराष्ट्र सरकारने 2005 मध्ये दरवाजाला देवदासी प्रथा निर्मूलन कायदा 2005 करण्यात आला . महाराष्ट्रात आढळणार्या काही अनिष्ट प्रथांमध्ये देवदासी प्रथा समाविष्ट आहे. पूर्वी ही प्रथा बर्याच प्रमाणात आढळत असे. शासनाने तिला आळा घालण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे तिचे मोठ्या प्रमाणावर निर्मूलन झाले आहे. या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा करण्यात आला. हा कायदा अतिशय सर्वसमावेशक असून त्यात या प्रथेला प्रोत्साहन देणारी व्यक्ती कारावास व दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला पात्र ठरविण्यात आली आहे. या कायद्यात देवदासी प्रतिबंधक अधिकारी नेमण्याची तरतूद असून त्यास देवदासी प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत.
राज्यस्तरावर देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी नियंत्रण मंडळ व जिल्हास्तरावर जिल्हा देवदासी निर्मूलन समिती स्थापन करण्याचीही त्यात तरतूद आहे .
महत्वाच्या बाबी :
* या कायद्यानंतर कुठल्याही रूढी वा पद्धतीनुसार स्त्रियांना देवदासी वा जोगतीण म्हणून दान करणे गुन्हा ठरतो.
* देवदासी प्रथेचा प्रसार करणे, त्या समारंभात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत करणे सुद्धा गुन्हा आहे.
* पूर्वी देवदासी झालेल्या स्त्रीने विवाह केल्यास तिचा विवाह व अपत्ये कायदेशीर ठरतील.
* एव्हाना, एखादा पुरुष देवदासी झालेल्या स्त्रीबरोबर एकाच घरात पर्याप्त काळापर्यंत पती-पत्नी भावनेने राहत असल्यास त्यांचा विवाह झाला आहे असेच गृहीत धरण्यात येईल, अशा विवाह संबंधातून निर्माण झालेली संततीसुद्धा वैध ठरेल व त्या अपत्यांना वडिलांच्या व्यक्तिगत कायद्यानुसार सर्व वारसाहक्क प्राप्त होतील.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या समित्या :
* राज्यस्तरावर देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात येईल. त्याचा अध्यक्ष किमान जिल्हा न्यायाधीश असणारीच व्यक्ती असेल.
*बाकी दोन सदस्यांमध्ये एक सदस्य महिलांच्या समस्यांचे निराकरण करणारी व्यक्ती, तर दुसरे शासनाचे महिला व बाल विकास आयुक्त असतील.
*तसेच जिल्हास्तरावर जिल्हा देवदासी निर्मूलन समिती निर्माण करण्यात येईल. जिचा अध्यक्ष जिल्ह्याचा मुख्य न्यायदंडाधिकारी असेल तर दोन सदस्यांपैकी जिल्हा बाल व महिला विकास अधिकारी एक सदस्य असेल तर दुसरा सदस्य महिलांच्या समस्यांचे निराकरण करणारी तज्ज्ञ व्यक्ती असेल.या नियंत्रण मंडळाला व जिल्हा समितीला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील.
देवदासी प्रथा निर्मूलन करणे काळाची गरज आहे . कायदे अंमलात आले आहेत पण समाजातील या महिलांचे प्रमाण वाढले जात आहे . त्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे . देवाच्या सेवेसाठी कितीतरी महिला या प्रथेला बळी पडतात . वाढले जाणारे केस अन् त्यातून निर्माण झालेली जट त्यामुळे देवाला सोडण्याचे प्रमाण वाढते आहे . देवाची सेवा करणे व देवाचा जागर करणे हे या महिलांचे आयुष्य व्यतित करतात . अखंड सौभाग्यवती हा जरी त्यांना अधिकार मिळत असेल तरी सुद्धा समाजाने आखून दिलेल्या प्रवाहाच्या बाहेर त्या असतात. समाजाचा दृष्टीकोन हा वेगळाच असतो . पश्चिम महाराष्ट्रात देवदासी महिलांचे प्रमाण अधिक आढळते . दलित समाजातील महिलांचे प्रमाण अधिक आढळते.अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले जाते .त्यातून निर्माण झालेल्या मुलांचे भविष्याच्या प्रश्न नक्कीच पुढे उभा राहतो .रूढी व परंपरा या साठी देवाच्या सेवेसाठी या महिलांचे आयुष्य पणाला नक्कीचं लागते आहे . देवदासी प्रथा बंद व निर्मूलन करणे ही काळाची गरज आहे .
गिरीशकुमार तुकाराम कांबळे
कोल्हापूर
9766936369
(अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद भुदरगड तालुका उपाध्यक्ष)








