रत्नागिरी, दि. ३१ : जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी नेमण्यात आलेल्या शिक्षकांबाबत महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देणाऱ्या शिक्षकांकडून तसे प्रतिज्ञापत्र घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) विश्वजीत गाताडे तसेच शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी तालुकानिहाय निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. निवडणुकीसाठी आवश्यक असणारे एकूण मनुष्यबळ, उपलब्ध मनुष्यबळ, सीटीईटी परीक्षा देणारे शिक्षक आणि त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट निर्देश दिले की, ज्या शिक्षकांना निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आले आहे आणि जे सीटीईटी परीक्षा देणार आहेत, अशा शिक्षकांना परीक्षेसाठी कार्यमुक्त करताना त्यांनी प्रत्यक्ष परीक्षा देणार असल्याबाबत प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे. तसेच त्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
निवडणूक प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक तालुक्यात मनुष्यबळाचे अचूक नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता किंवा जादा मनुष्यबळ असल्यास त्याची माहिती त्वरित जिल्हा प्रशासनाला कळवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक कामकाजातील नियमावली, जबाबदाऱ्या आणि शिस्त याबाबत योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना कामासाठी सज्ज करावे, असे निर्देश देण्यात आले.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत व वेळेत पार पडावी यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करण्यावर भर देण्यात आला. मनुष्यबळ व्यवस्थापन, परीक्षेच्या तारखा आणि निवडणूक कार्यक्रम यामध्ये समन्वय राखून कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ ही जिल्ह्यासाठी महत्त्वाची लोकशाही प्रक्रिया असून, प्रशासनातील प्रत्येक घटकाने जबाबदारीने व शिस्तबद्धपणे काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी या बैठकीत केले.