गुहागर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार सौ. पारिजात पराग कांबळे यांची स्पष्ट भूमिका; “लोकशाहीत प्रत्येकाला पक्ष निवडण्याचा अधिकार”

आबलोली, दि. ३० (संदेश कदम) : गुहागर नगर पंचायत निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ठाकरे गटाच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारीवरून आणि त्यांच्या पतींचे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष असण्यावरून विरोधक चर्चा करत असताना, उमेदवार सौ. पारिजात पराग कांबळे यांनी यावर स्पष्ट आणि ठाम प्रतिक्रिया नोंदवली आहे.

“भारतामध्ये लोकशाही आहे. प्रत्येकाला कोणत्या पक्षात रहायचे याचा अधिकार संविधानाने दिला आहे. माझे पती बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत ही बाब खरी आहे, पण मी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी सर्वात आधी घरातील व्यक्तींची संमती घेतली. त्यानंतरच महाविकास आघाडी-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे उमेदवारीची मागणी केली,” असे त्या म्हणाल्या.

त्यांनी पुढे सांगितले की, आज घराघरात विविध पक्षांचे सदस्य असतात. त्यामुळे केवळ पती वेगळ्या पक्षात आहेत म्हणून पत्नीने निवडणूक लढवू नये, अशी कल्पना लोकशाहीत योग्यच ठरणार नाही.

पूर्वी पाठिंबा कमी; आज भक्कम साथ — सौ. कांबळे

मागील दोन निवडणुकांमध्ये उभे राहूनही संधी हातातून गेल्याचा उल्लेख करत त्या म्हणाल्या,
“तेव्हा माझ्या पाठीशी भक्कम पाठिंबा नव्हता. आज मात्र पक्षासोबतच गुहागरचे आमदार मान. भास्करशेठ जाधव हे आमच्या पाठी मजबुतीने उभे आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे.”

गुहागर शहरातील विकासाला प्राधान्य

आपण निवडून आल्यानंतर कोणते बदल घडवणार या प्रश्नाला उत्तर देताना सौ. पारिजात कांबळे म्हणाल्या :

“गुहागरमध्ये रस्ते, पाणी, वीज आणि पर्यटन विकासाच्या अनेक समस्या आहेत. नगर पंचायत स्थापनेच्या सुरुवातीला आमदार भास्करशेठ जाधव यांनी अनेक सुविधा आणल्या होत्या, मात्र नंतर त्याची गती कमी झाली.
आता नवीन योजना, नवीन सुधारणा आणि एक स्पष्ट विकासाचा व्हिजन घेऊन महाविकास आघाडीची टीम कामाला लागेल. गुहागर शहराला विकासाच्या दिशेने पुढे नेणे हा आमचा ठाम निर्धार आहे.”

त्यांनी सांगितले की, फक्त आश्वासन नाही, तर शहराचे रूपांतर करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जातील.

आणखी वाचा