इशान किशनच्या वादळी शतकानंतर अर्शदीपचा ‘पंजा’; टीम इंडियाकडून किवींचा दारुण पराभव, मालिका 4-1 ने जिंकली

तिरुवनंतपुरम, दि. ३१ :- आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाने आपली तयारी ठामपणे दाखवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना 46 धावांनी जिंकत भारताने मालिका 4-1 अशी आपल्या नावावर केली. या सामन्यात इशान किशनच्या वादळी शतकानंतर अर्शदीप सिंगच्या ऐतिहासिक पाच विकेट्समुळे किवी संघाचा पराभव झाला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताने 20 षटकांत तब्बल 271 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात न्यूझीलंड संघ आक्रमक सुरुवात करूनही धावगतीचा दबाव सहन करू शकला नाही आणि 19.4 षटकांत 225 धावांवर सर्वबाद झाला.
इशान किशनचे वादळी शतक
भारतीय डावाची सुरुवात मात्र संमिश्र झाली. संजू सॅमसन पुन्हा एकदा अपयशी ठरत अवघ्या 6 धावांवर बाद झाला. अभिषेक शर्माने 16 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 30 धावांची झंझावाती खेळी केली.
यानंतर इशान किशन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी केवळ 57 चेंडूत 137 धावांची तुफानी भागीदारी रचली. इशान किशनने ईश सोधीच्या एका षटकात 6 चौकार ठोकत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली.
इशान किशनने केवळ 42 चेंडूत आपले पहिले टी-20 आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. त्याने 43 चेंडूत 10 षटकार आणि 6 चौकारांसह 103 धावा करत भारतीय डावाला भक्कम पाया दिला. सूर्यकुमार यादवनेही त्याला उत्तम साथ दिली.
अर्शदीप सिंगचा ऐतिहासिक ‘पंजा’
271 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 17 धावांवर टिम सेफर्ट बाद झाला. त्यानंतर फिन अ‍ॅलन आणि रचिन रवींद्र यांनी दुसऱ्या विकेटसाठी 48 चेंडूत 100 धावांची भागीदारी करत सामन्यात रंग भरला.
ही धोकादायक जोडी अक्षर पटेलने फिन अ‍ॅलनला बाद करत फोडली. फिन अ‍ॅलनने 38 चेंडूत 80 धावांची खेळी केली होती. यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पकड मजबूत केली.
अर्शदीप सिंगने पहिल्या दोन षटकांत 40 धावा दिल्यानंतर शानदार पुनरागमन करत 12व्या षटकात दोन विकेट्स घेतल्या. शेवटच्या षटकात आणखी एक विकेट घेत त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले पाच विकेट्स (फाइव्ह विकेट हॉल) घेतले. अर्शदीपच्या या कामगिरीमुळे न्यूझीलंडचा डाव कोलमडला.
भारताचा नवा विक्रम
या विजयासह न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत पाकिस्ताननंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारताचा हा 18 वा टी-20 विजय असून, यासह भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे (इंग्लंडचे 17 विजय).
विश्वचषकापूर्वी मोठा संदेश
हा विजय केवळ मालिकेतील यश नाही, तर आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने इतर संघांना दिलेला ठाम इशाराच मानला जात आहे. फलंदाजांची आक्रमक शैली आणि गोलंदाजांची निर्णायक कामगिरी यामुळे टीम इंडिया आत्मविश्वासाने पुढील आव्हानांसाठी सज्ज झाली आहे.

आणखी वाचा