चिपळूण, दि. २८ : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत 0-2 असा पराभव स्वीकारल्यानंतर आता भारतीय संघ वनडे मालिकेच्या तयारीला लागला आहे. 30 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत संघाची रचना काही प्रमाणात बदललेली दिसेल. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे उपलब्ध नसल्याने कर्णधारपद केएल राहुलकडे आहे; परंतु सलामीवीराची मोठी पोकळी भरून काढण्यासाठी आता निवडीचा ‘गंभीर’ पेच उभा राहिला आहे.
रोहितसोबत कोण? यशस्वी की ऋतुराज?
शुभमनच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला नवीन ओपनिंग पार्टनरची गरज आहे. संघाकडे यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड हे दोन प्रमुख पर्याय आहेत. राहुल स्वतः पाचव्या-सहाव्या क्रमांकावर स्थिरावल्यानं तो ओपनिंगला येण्याची शक्यता कमी आहे.
दोघांची कामगिरी काय सांगते?
यशस्वीने आजवर फक्त एकच वनडे खेळला आहे — फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्ध, ज्यात त्याने 15 धावा केल्या. तो अनेक मालिकांत बॅकअप ओपनर म्हणून असला, तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळालेलं नाही.
याच्या उलट, ऋतुराज गायकवाडने सहा वनडे खेळले असून त्यातील चार सामने त्याने सलामीवीर म्हणून खेळले आहेत. त्याची 19.16 सरासरीनं 115 धावा असली तरी अनुभव अधिक आहे. विशेष म्हणजे त्याने केलेल्या 115 पैकी 98 धावा ओपनर म्हणूनच केल्या आहेत.

लिस्ट ए मधील आकडे ऋतुराजच्या समर्थनात
ऋतुराजचे लिस्ट ए रेकॉर्ड अत्यंत दमदार आहेत — 89 सामन्यात 57.39 सरासरीनं तब्बल 4534 धावा, ज्यात 17 शतकं व 17 अर्धशतकं. अलीकडील दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्धच्या मालिकेतही त्याने 117, 68* आणि 25 धावा करून सलामीवीर म्हणून चांगली फॉर्म दाखवली.
यशस्वीचे लिस्ट ए रेकॉर्डदेखील प्रभावीच — 33 सामन्यांत 52.62 सरासरीनं 1526 धावा, त्यात 5 शतकं व 7 अर्धशतकं. मात्र अनुभव आणि सातत्य या बाबतीत ऋतुराज पुढे आहे.
यशस्वीला संधी मिळेल का?
डाव्या-उजव्या हाताच्या कॉम्बिनेशनचा विचार केला तर जैस्वालला संधी मिळू शकते. पण फॉर्म, अनुभव आणि अलीकडील प्रदर्शन पाहता ऋतुराज गायकवाड हा रोहितचा सलामी जोडीदार बनण्याचा सर्वात मजबूत दावेदार मानला जात आहे. शुभमन परतल्यावर संयोजन बदलणारच आहे. यशस्वीला तातडीने संधी मिळण्याची शक्यता कमी असली, तरी भविष्यातील वनडे संघात त्याची भूमिका महत्त्वाची असेल, विशेषत: रोहित शर्मा 2027 विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची शक्यता गृहीत धरली तर.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा वनडे संघ :
केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.
वनडे मालिकेचं वेळापत्रक :
पहिला सामना : 30 नोव्हेंबर – रांची
दुसरा सामना : 3 डिसेंबर – रायपूर
तिसरा सामना : 6 डिसेंबर – विशाखापट्टणम








