गुवाहाटी, दि. २२: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर आज (२२ नोव्हेंबर) सुरू झाला. या पहिल्याच कसोटीत नवीन वेळापत्रक आणि वेगळ्या नियमानुसार खेळला जात असलेला सामना आफ्रिकेने पहिल्या दिवशी आपल्या नियंत्रणात ठेवला. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ६ बाद २४७ धावा केल्या. सेनुरन मुथुस्वामी २५ आणि काइल व्हेरेन १ धावांवर नाबाद होते. भारताकडून कुलदीप यादवने उत्कृष्ट फिरकी गोलंदाजी करत ३ विकेट्स घेतल्या.
आफ्रिकेची दमदार सुरुवात
दक्षिण आफ्रिकेने दमदार सुरुवात करत भारताच्या गोलंदाजांना चांगलाच दम दिला. सलामीवीर एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी अर्धशतकी भागीदारी केली. जसप्रीत बुमराहने मार्करामला ३८ धावांवर बाद करत भारताला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर लगेचच कुलदीप यादवने रिकेल्टनला (३५) बाद केले.
मध्यफळीतील टेम्बा बावुमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करून आफ्रिकेला मजबूत स्थितीत आणले. रवींद्र जडेजाने बावुमाला ४१ धावांवर बाद केले. त्यानंतर एकेका खेळाडूंना रोखत कुलदीप यादवने स्टब्स (४९) आणि वियान मुल्डरला बाद करत आफ्रिकेला मोठा धक्का दिला. पहिल्या दिवसाचा सहावा बळी टोनी डी झोर्झी होता, जो २८ धावांवर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
प्लेइंग 11 मध्ये बदल
भारताने या सामन्यात दोन बदल केले. शुभमन गिलच्या जागी नितीश रेड्डीला स्थान मिळाले, तर अक्षर पटेलला वगळून साई सुदर्शनला संधी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेने एक बदल करत कॉर्बिन बॉशच्या जागी फिरकी गोलंदाज सेनुरन मुथुस्वामीला स्थान दिले. त्यामुळे आफ्रिकेने तीन फिरकी गोलंदाज मैदानात उतरवले आहेत.
गुवाहाटी कसोटीतील नवा प्रयोग
गुवाहाटीमध्ये कसोटी सामना पहिल्यांदाच होत असून वेळापत्रकात एक आगळा-वेगळा बदल करण्यात आला आहे. सामन्याचा टॉस सकाळी ८.३० वाजता तर खेळ ९ वाजता सुरू झाला. पहिले सत्र सकाळी ९ ते ११ अशी दोन तासांची मर्यादा ठेवण्यात आली असून त्यानंतर चहापानाचा ब्रेक दिला जात आहे. लंच ब्रेक नंतरचे सत्र दुपारी १.२० पर्यंत आणि शेवटचे सत्र २ ते ४ या वेळेत खेळवले जाणार आहे. आवश्यक असेल तर खेळ अर्धा तास वाढवून ४.३० वाजेपर्यंत जाऊ शकतो.
पहिल्या दिवसाअखेर सामना दक्षिण आफ्रिकेच्या ताब्यात दिसत असला तरी भारताने घेतलेली महत्वाची विकेट्स उद्या निर्णायक ठरू शकतात. गोलंदाजांनी सुरुवात चांगली केल्याने दुसरा दिवस भारतासाठी संधीचा ठरेल अशी अपेक्षा आहे.








