दक्षिण आफ्रिकेचा भारतावर दणदणीत विजय; 2024 च्या पराभवाचा बदला पूर्ण

अहमदाबाद, दि. २३ : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 च्या सुपर-8 टप्प्यात झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 77 धावांनी शानदार विजय मिळवला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या लढतीत प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 7 बाद 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 18.2 षटकांत केवळ 111 धावांवर गारद झाला. यासह भारताची टी-20 विश्वचषकातील सलग 12 सामन्यांची विजयी मालिका संपुष्टात आली असून उपांत्य फेरीतील प्रवेशही कठीण झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलर याने 63 धावांची दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याला डेवाल्ड ब्रेव्हिसने 29 चेंडूत 45 धावांची साथ दिली. या दोघांमध्ये 97 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. अखेरच्या षटकांत ट्रिस्टन स्टब्सने 24 चेंडूत 44 धावांची झंझावाती खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 3, अर्शदीप सिंगने 2 तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

188 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्याच षटकात ईशान किशन शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा (15) आणि तिलक वर्मा (1) स्वस्तात माघारी परतले. पॉवरप्लेमध्ये भारताची अवस्था 3 बाद 31 अशी झाली होती. कर्णधार सूर्यकुमार यादव (18) आणि वॉशिंग्टन सुंदर (11) यांनी काही काळ झुंज दिली, मात्र तेही मोठी खेळी करू शकले नाहीत. शिवम दुबे (42) आणि हार्दिक पांड्या (18) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण आवश्यक धावगती वाढत गेल्याने भारत पराभवाकडे झुकला.

दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत भारताला सावरण्याची संधीच दिली नाही. मार्को जान्सनने 4 विकेट घेतल्या, तर केशव महाराजने 3 विकेट मिळवत भारतीय फलंदाजी उद्ध्वस्त केली.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने 2024 च्या टी-20 विश्वचषक अंतिम सामन्यात भारताकडून झालेल्या पराभवाचा बदला घेतला. या सामन्यानंतर भारताच्या संघनिवडीवर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. विशेषतः उपकर्णधार अक्षर पटेलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आल्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत.

भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने या निर्णयावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, आयपीएलसारखी प्रयोगशील रणनीती आयसीसी स्पर्धांमध्ये चालत नाही. अक्षर पटेल हा संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू असून, त्याला वगळणे संघाच्या स्थिरतेवर परिणाम करणारे ठरले आहे, असे त्याचे मत आहे. 2024 च्या अंतिम सामन्यात अक्षरने विराट कोहलीसोबत महत्त्वाची भागीदारी केली होती, याची आठवणही त्याने करून दिली.

या पराभवामुळे भारताचा नेट रनरेट घसरला असून उपांत्य फेरीतील वाटचाल अधिक कठीण झाली आहे. आता उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकणे भारतासाठी अनिवार्य ठरणार आहे. पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध तर शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध होणार आहे. क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आता टीम इंडियाच्या पुनरागमनाकडे लागल्या आहेत.

आणखी वाचा