खेड नगरपरिषदेत महायुतीची एकहाती सत्ता; २१–० ने ऐतिहासिक विजय

खेड, दि. २१ : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने खेड नगरपरिषद निवडणुकीत २१–० असा ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवत नगरपरिषदेत एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. महायुतीने सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांना पूर्णपणे नामोहरम केले असून, या निवडणुकीत महाविकास आघाडीला खातेही उघडता आले नाही.

२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र मतमोजणी पूर्ण होताच महायुतीने क्लीन स्वीप करत आपली ताकद दाखवून दिली. या निकालाने खेडच्या राजकारणात नवा इतिहास घडवला असून, महायुतीच्या एकसंध नेतृत्वावर जनतेने ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

या घवघवीत विजयामुळे माधवी भुटाला या खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख धोरणे, मजबूत नेतृत्व आणि स्थिर प्रशासनावरचा विश्वास अधोरेखित झाला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे १७ उमेदवार तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले असून, महायुतीकडून एकूण सर्व २१ जागांवर विजय मिळवण्यात आला आहे. २१–० चा हा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा मानला जात आहे.

दरम्यान, राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकालही जवळपास पूर्ण झाले असून, या निवडणुकांमध्ये भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी चांगली कामगिरी केली आहे. राज्यभरात भाजपने १०० पेक्षा अधिक नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली असून, सुमारे १२० नगराध्यक्ष भाजपचे झाले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता, चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुतीने विरोधकांची धूळधाण केली आहे. जिल्ह्यातील सातपैकी सहा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. मात्र राजापूर नगरपरिषदेत काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिपे यांनी विजय मिळवत काँग्रेसला दिलासा दिला आहे.

एकूणच खेड नगरपरिषदेसह जिल्हा व राज्यातील निकालांनी महायुतीच्या नेतृत्वावर जनतेचा वाढता विश्वास अधोरेखित केला असून, आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा