चिपळूण, दि. २१ : कोकणातील तरुणांनी मोठ्या शहरांमधील नोकऱ्यांच्या मागे न धावता स्थानिक शेतीकडे वळावे, मेहनत आणि जिद्दीने शेती केली तर गावाचे भविष्य बदलू शकते, असा प्रेरणादायी संदेश कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिला. “हिंमत हरलेला योद्धा कधीच जिंकत नाही; त्याचप्रमाणे शेतकरी जर हार मानली तर शेती कशी उभी राहील? आत्मविश्वासाने शेती करा आणि सहकाराच्या माध्यमातून गावाचा विकास साधा,” असे ते म्हणाले.
चिपळूण येथे आयोजित ७२ व्या अखिल भारतीय सहकार सप्ताहातील सहकार मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करत होते. हा मेळावा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बोर्ड आणि कृषीभूषण डॉ. तानाजीराव कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाला आमदार शेखर निकम, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्हवणेकर, अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले आणि जिल्हा उपायुक्त (पर्यटन व दुग्ध व्यवसाय) डॉ. दत्तात्रय सोनावले यांसह २५० हून अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात डॉ. चोरगे यांनी तरुण पिढीला वास्तवाचे भान करून दिले. “भात, गहू किंवा अन्नधान्य कारखान्यात तयार होत नाही, त्यासाठी जमिनीवर काम करावंच लागतं. मुंबईत १०-१२ हजारांची नोकरी करण्यापेक्षा गावात राहून शेतीत, मत्स्यव्यवसायात, कुक्कुटपालनात वा इतर पूरक व्यवसायांत भविष्य आहे. गावात हवा शुद्ध, घर स्वतःचे आणि जीवनात स्वाभिमान आहे,” असे ते म्हणाले.
सहकारी संस्थांच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी केरळचा आदर्श सांगितला. “तेथील सोसायट्या बँकांसारख्या चालतात आणि कोट्यवधींचा व्यवहार करतात. आपल्या विकास सोसायट्यांनी फक्त कर्ज वाटण्यापुरत्या न राहता गावात थेट रोजगार निर्माण केला पाहिजे. प्रत्येकी किमान दहा तरुणांना रोजगार देण्याची जबाबदारी सोसायट्यांनी घ्यावी,” असा जोरदार सल्ला त्यांनी दिला.
शेतीतील कामगार टंचाईवर उपाय म्हणून त्यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला. “आता नांगरणीपासून कापणीपर्यंत आधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत. पाच गावांनी एकत्र गुंतवणूक केली तर कम्बाईन हार्वेस्टरसारखे यंत्र घेणे सहज शक्य आहे. ‘ग्रुप फार्मिंग’ हा भविष्यातील शेतीचा मार्ग आहे,” असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील टेरवकर यांनी केले, तर स्वागत आणि आभारप्रदर्शन जिल्हा बँकेचे संचालक रामभाऊ गराटे यांनी केले. सहकार, आधुनिक शेती आणि रोजगारनिर्मिती यांचे एकत्र मॉडेल कोकणात तयार झाले, तर ग्रामीण भागातून पलायन थांबेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.










