लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधातील उपोषणस्थळी शिवजयंती साजरी करून कंपनीचा जाहीर निषेध

‘करो या मरो’ भूमिकेवर आंदोलक ठाम; विषारी प्रकल्प बंद करण्यासाठी जनआंदोलन तीव्र

खेड, दि. २० : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी अग्रो (लक्ष्मी ऑरगॅनिक) कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला ३० दिवस पूर्ण झाले असून, आंदोलनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती क्रांतिकारी विचारांच्या वातावरणात साजरी करण्यात आली. श्री अशोक रावजी जाधव व श्री राजूभाई आंब्रे हे दोघे आंदोलक गेल्या महिन्याभरापासून कंपनीच्या मुख्य गेटसमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र इतका कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीतून तयार होणाऱ्या रासायनिक घटकांमुळे पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला होणारा संभाव्य धोका. आंदोलकांचा आरोप आहे की हा प्रकल्प कोकणाच्या पर्यावरणावर घाला घालणारा असून भविष्यात गंभीर आजारांचे संकट निर्माण करू शकतो. त्यामुळे ही कंपनी कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे.

सुरुवातीला केवळ दोन आंदोलकांनी सुरू केलेले हे आंदोलन आता व्यापक जनआंदोलनाचे स्वरूप घेत आहे. स्थानिक ग्रामस्थ, महिला वर्ग, सामाजिक संस्था तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होत असून आंदोलनस्थळी दररोज वाढती उपस्थिती दिसून येत आहे.

शिवजयंती निमित्त आंदोलनाला क्रांतिकारी स्वरूप

१९ फेब्रुवारी रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत असताना, परशुराम लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या गेटवरही वेगळ्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना अनुसरून आंदोलन अधिक तीव्र करण्याची शपथ यावेळी आंदोलकांनी घेतली.

या कार्यक्रमात कोकणातील असंख्य महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पर्यावरण रक्षणाची व अन्यायाविरोधात संघर्ष करण्याची शपथ घेण्यात आली. “ही केवळ शिवजयंती नसून कोकण वाचविण्याची शिवजयंती आहे,” अशी भावना अनेक वक्त्यांनी व्यक्त केली.

आंदोलनकर्त्यांचे आरोप व भूमिका

या वेळी प्रमुख आंदोलक अशोक रावजी जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी हा कोकणाच्या माथ्यावर लादलेला विषारी प्रकल्प आहे. आमच्या जमिनी, पाणी आणि पुढील पिढ्यांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या कंपनीला कायमस्वरूपी बंद पाडल्याशिवाय आमचा लढा थांबणार नाही. आम्ही ‘करो या मरो’ या भूमिकेवर ठाम आहोत.”

राजूभाई आंब्रे यांनी सांगितले की, “३० दिवस झाले तरी प्रशासनाने साधी चौकशीही केलेली नाही. लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकल्पावर कारवाई न होणे ही लोकशाहीची शोकांतिका आहे.”

यावेळी सुबोध सावंत देसाई व संगीता लोटे यांनीही आंदोलनाला पाठिंबा देत पर्यावरण संरक्षणासाठी एकत्र लढण्याचे आवाहन केले. विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी कंपनीविरोधात रोष व्यक्त करत शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी केली.

इटलीतील बंद कंपनीचा संदर्भ आणि वाढलेली भीती

या आंदोलनाला अधिक धार येण्यामागे नुकतीच समोर आलेली एक धक्कादायक माहिती कारणीभूत ठरली आहे. इटलीमध्ये गंभीर पर्यावरणीय प्रदूषणप्रकरणामुळे बंद करण्यात आलेली ‘मिटेनी एस.पी.ए.’ ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे लोटे एमआयडीसीत कार्यरत झाल्याचा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

इटलीच्या व्हेनेटो प्रांतात या कंपनीकडून पीएफएएस (Per and Polyfluoroalkyl Substances) ही अत्यंत घातक रसायने तयार केली जात होती. ही रसायने ‘फॉरेव्हर केमिकल्स’ म्हणून ओळखली जातात, कारण ती मानवी शरीरात आणि पर्यावरणात दीर्घकाळ टिकून राहतात. या रसायनांमुळे सुमारे साडेतीन लाख नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते आणि कर्करोग, वंध्यत्व, थायरॉईड विकार यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले होते.

या प्रकरणानंतर २०१८ मध्ये मिटेनी कंपनी दिवाळखोर ठरली आणि २०२५ मध्ये इटलीतील न्यायालयाने तिच्या ११ माजी अधिकाऱ्यांना एकूण १४१ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. युरोपमध्ये दोषी ठरलेली ही कंपनी भारतात अप्रत्यक्षपणे कार्यरत असल्याचा आरोप झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यंत्रसामग्री भारतात आणल्याचा आरोप

पर्यावरण संघटनांच्या माहितीनुसार, लक्ष्मी ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीजने २०१९ मध्ये मिटेनी कंपनीची यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि पेटंट्स लिलावाद्वारे खरेदी केली. सुमारे ३०० कंटेनर्समधून ही यंत्रणा भारतात आणण्यात आली असून ती लोटे परशुराम एमआयडीसीतील ‘यलोस्टोन फाईन केमिकल्स’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पात वापरली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे.

लोटे परिसर आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे संवेदनशील मानला जातो. वशिष्ठी नदी, भूगर्भातील पाणी, शेती व मानवी आरोग्यावर येथील रासायनिक उद्योगांचा परिणाम यापूर्वीही चर्चेत आला आहे. अशा परिस्थितीत पीएफएएससारख्या रसायनांचे उत्पादन झाल्यास त्याचे दीर्घकालीन दुष्परिणाम कोकणाच्या पर्यावरणावर आणि पुढील पिढ्यांच्या आरोग्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

प्रशासनाची भूमिका व आंदोलकांची मागणी

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाला कडक अटींसह परवानगी दिल्याचा दावा केला असला तरी इटलीत प्रदूषणास कारणीभूत ठरलेलीच यंत्रसामग्री येथे वापरली जात असल्याने या अटींच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आंदोलकांनी या प्रकल्पाचे स्वतंत्र वैज्ञानिक परीक्षण करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संबंधित कंपनीचे काम सध्या बंद असून प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र आंदोलकांनी हा निर्णय अपुरा असून कंपनी कायमस्वरूपी बंद करण्याचा ठोस आदेश द्यावा, अशी मागणी केली आहे.

जनतेचा निर्धार

आंदोलनस्थळी उपस्थित नागरिकांनी, “ही कंपनी कोकणातून हद्दपार झाली पाहिजे. भविष्यात असे विषारी प्रकल्प कोकणात येऊ नयेत, यासाठी आम्ही एकत्र लढा देऊ,” असा निर्धार व्यक्त केला. शिवजयंतीच्या दिवशी घेतलेली ही शपथ केवळ उत्सवापुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याचा संकल्प आंदोलकांनी केला आहे.

लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधातील हा लढा आता केवळ स्थानिक प्रश्न न राहता पर्यावरण व आरोग्य संरक्षणाचा व्यापक मुद्दा बनला आहे. प्रशासनाने तातडीने याची गंभीर दखल घेऊन ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूप धारण करेल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

आणखी वाचा