राज्यस्तरीय ग्रामीण–कृषी–सहकार साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मांडकी–पालवण (चिपळूण), दि. ५ : कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था, मांडकी–पालवण येथील भव्य क्रीडांगणावर होणाऱ्या शासन पुरस्कृत राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीच्या कामाचा उद्घाटन सोहळा आज गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी २०२६) सकाळी ११ वाजता संयोजन समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश देशपांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, प्रमुख कार्यवाह डॉ. निखिल चोरगे, स्मरणिका छपाई समिती अध्यक्षा सौ. अंजली चोरगे, कोषाध्यक्ष श्री. अजय चव्हाण, साहित्य संमेलनाच्या प्रसिद्धी व प्रचार समिती प्रमुख डॉ. शमिका चोरगे, संस्थेचे सचिव श्री. मिलिंद सुर्वे, प्राचार्य डॉ. संकेत कदम, प्राचार्य सचिन तांबेकर तसेच रावसाहेब सुर्वे उपस्थित होते.

मांडकी–पालवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणारे हे राज्यस्तरीय ग्रामीण–कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अधोरेखित करणारे ठरणार आहे. या संमेलनात ग्रामीण साहित्य, कृषी सुधारणा, सहकार चळवळ, कोकणातील सांस्कृतिक परंपरा यावर आधारित परिसंवाद, कवी संमेलन, ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, कथाकथन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंडप उभारणीच्या उद्घाटनानंतर संमेलनाच्या तयारीला अधिक गती मिळाली असून संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजकांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्व व्यवस्था सुरू केल्यामुळे संमेलन भव्य आणि यशस्वी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे असून संयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. प्रकाश देशपांडे काम पाहत आहेत. प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे जबाबदारी सांभाळत आहेत. ग्रामीण जीवन, शेती, सहकार आणि साहित्य यांचे नाते अधिक दृढ करणारे हे संमेलन राज्यातील साहित्यप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी व अभ्यासकांसाठी वैचारिक पर्वणी ठरणार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील साहित्यिक विचारांचा जागर करणारे हे संमेलन कोकणातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळीला नवे बळ देणारे ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

आणखी वाचा