पोलादपूर, २४ (प्रतिनिधी– शैलेश पालकर): मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर पहाटे घडलेल्या भीषण अपघाताने महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्वारगेट, पुणे येथून दापोलीकडे जाणारी खासगी मिनी बस भोगाव बुद्रुकजवळील पुलाच्या आधी रिफ्लेक्टर नसलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यांना जोरदार धडक देत जवळपास ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात बसमधील २२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी १० जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे.
घटनावेळी पहाटेचे साडेचार वाजण्याचे सुमारास परिसरात धुके पसरले होते. पोलादपूर–खेड मार्गावरील भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने महामार्गावरील एका लेनमध्ये वाहतूक बंद होती. धुक्यामुळे दृश्यता कमी असताना रिफ्लेक्टर नसलेल्या लोखंडी कठड्यांचा अंदाज न आल्याने चालक सूरज गागनाथ अलकुंटे (वय २५, रा. कात्रज, पुणे, मूळ रा. अलकुंटे, जि. सोलापूर) याच्या बसने कठड्यांना धडक दिली. विशेष म्हणजे हे कठडे जमिनीत मजबुतीने काँक्रीटने रोवलेले नसल्याने बससोबत तेही दरीत कोसळले. यामुळे बसची पडझड अधिक वेगाने झाली.
बस कोसळताच प्रवाशांच्या किंचाळण्यांचा आवाज होऊ लागला. त्याचवेळी लोखंडी कठड्यांचे बसविरोधी आपटल्यामुळे झालेला कर्णकर्कश्य आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले आणि जखमींना वर ओढून महामार्गावर आणले. त्यानंतर पोलादपूर पोलिस, महामार्ग सुरक्षा दल आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य वेगाने पुढे नेले.
जखमींना तात्काळ खेड तालुक्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे अत्यंत जखमी अवस्थेत शामल विजय आंजर्लेकर (वय ४०), काजल मारुती शिगवण (वय २३), दिलीप शिवराम मोहिते (वय ५५), अमरनाथ मिलिंद कांबळे (वय २७), दिपाली दत्ताराम काचरे (वय २७), प्रतिक प्रकाश गुरव (वय २२), प्रिया प्रकाश गुरव (वय २३), आनंदी बालाजी नाचरे (वय ७४), सर्वेश दीपक गुहागरकर (वय २२), मुजिब अल्लाबकाश दलाल (वय १९), मयुरी मारुती शिगवण (वय ४५) यांच्यासह चालक–वाहक आदिसह इतरांना खेड येथील खासगी हॉस्पिटल तसेच डेरवण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
या अपघाताबाबतची फिर्याद प्रवासी महिला शिक्षिका नयना स्वप्नील कालेकर (वय ३५, रा. जालगाव, दापोली) यांनी पोलिसात नोंदवली. त्यानुसार पोलादपूर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बामणे यांनी र. नं. १०४/२०२५ नुसार बसचालक सूरज अलकुंटे यांच्या विरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून लोकांना धोका निर्माण केल्याप्रकरणी कलम २८१, १२५(अ), १२५(ब) भा.दं.वि. आणि मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथकाने विशेष तैनाती केली. या अपघातानंतर महामार्गालगत लोखंडी संरक्षक कठडे योग्यरीत्या काँक्रीटने न बसवणे, त्यावर रिफ्लेक्टर न लावणे यामुळे प्रवाशांचे जीव धोक्यात जात असल्याचे अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असताना सुरक्षेच्या प्राथमिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याने भविष्यात आणखी गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा संताप या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.








