नरेंद्र मोदी ३.० पर्व ; पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ

नवी दिल्ली, दि. ०९ (वृत्तसंस्था): नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ७१ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर रविवारी नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला. पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेते उपस्थित आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी शपथ घेतली. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्‍यानंतर नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनादेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यासोबत महाराष्ट्रातील मंत्री चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुरेश खाडे, छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर  कार्यक्रमात सहभागी झाले होते. या सर्व नेत्यांनी मोदींच्या शपथविधीचे कौतुक केले आणि देशाच्या पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.

या शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव , रक्षा खडसे, आणि मुरलीधर मोहोळ  केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनातील या शपथविधी सोहळ्यात उपराष्ट्रपती जयदीप धनखड, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यासह देशातील विविध राज्यांचे प्रमुख, राजकीय नेते, उद्योगजगताचे मान्यवर आणि अनेक परराष्ट्र प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली. श्री मोदी यांनी आपल्या भाषणात सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या ऐतिहासिक सोहळ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाची सुरुवात झाली असून पुढील वर्षांमध्ये देशाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबविले जातील.

आज एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, यामध्ये ३० केंद्रीय मंत्री, ५ राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्यमंत्री यांचा समावेश आहे.

आणखी वाचा