रत्नागिरी, दि. 12 : तंत्रज्ञान हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला असून, काळानुसार त्यात सातत्याने बदल होत आहेत. यांत्रिक उपकरणांपासून ते डिजिटल आणि स्मार्ट तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास आपण सर्वच क्षेत्रांत अनुभवत आहोत. घड्याळ, टीव्ही, रेडिओ, कॉम्प्युटर, मोबाईल यांसारख्या साधनांप्रमाणेच आता वीज मोजणीच्या क्षेत्रातही स्मार्ट तंत्रज्ञानाने प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणकडून राज्यातील ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (टाईम ऑफ डे) वीजमीटर बसवण्यात येत आहेत. 9 ते 23 फेब्रुवारीदरम्यान स्मार्ट मीटर पंधरवडा साजरा होत आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया स्मार्ट मीटरचे फायदे.
महावितरण ही राज्यातील सुमारे 3 कोटी 16 लाख वीजग्राहकांना वीजपुरवठा करणारी शासकीय कंपनी असून, वीजबिलांच्या अचूकतेला आणि पारदर्शकतेला नेहमीच प्राधान्य दिले आहे. यापूर्वी फोटो मीटर रीडिंग, मोबाईल अॅपद्वारे रीडिंग, केंद्रीकृत बिलिंग प्रणाली यांसारखे उपक्रम राबवून ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. आता त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा म्हणजे स्मार्ट टीओडी मीटर होय.
स्मार्ट टीओडी मीटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित आणि अचूक मीटर रीडिंग. जुन्या पद्धतीत मानवी हस्तक्षेपामुळे चुकांची शक्यता असायची, अंदाजे बिल दिले जायचे किंवा रीडिंग न मिळाल्यास तक्रारी निर्माण होत होत्या. स्मार्ट मीटरमुळे हे सर्व प्रश्न संपुष्टात येत आहेत. तसेच स्मार्ट टीओडी मीटरमुळे ग्राहकास प्रत्येक तासांचा वीजवापर, व्होल्टेज, वीजभार याची आकडेवारी त्याच्या मोबाईल फोनवर पारदर्शीपणे उपलब्ध होत आहे. ग्राहकाचे दरमहा अचूक वापरानुसारच बिल तयार होत आहे. घर बंद असले, कंपाउंड लॉक असले तरीही रीडिंग आपोआप घेतले जात आहे. या मीटरमधील टीओडी प्रणालीमुळे वीजदरात थेट सवलत मिळत आहे. सकाळी 9 ते सायंकाळी या कालावधीत वापरलेल्या विजेसाठी प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत देण्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. ही सवलत 1 जुलै 2025 पासून लागू झाली असून, घरगुती ग्राहकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे स्मार्ट मीटर महावितरणकडून मोफत बसवण्यात येत आहेत. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. तसेच हे मीटर पोस्टपेड असून, सध्याप्रमाणेच मासिक बिलिंग प्रणाली कायम आहे.
सौर ऊर्जेच्या दृष्टीनेही स्मार्ट टीओडी मीटर अत्यंत उपयुक्त आहेत. नेटमीटर प्रणालीमुळे छतावरील सौर प्रकल्पातून निर्माण होणारी व वापरली जाणारी वीज तसेच ग्रीडला दिलेली अतिरिक्त वीज याचा अचूक हिशेब ठेवता येतो. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत सौर प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांसाठी हे मीटर विशेष फायदेशीर ठरले आहेत. एकूणच, स्मार्ट टीओडी मीटर म्हणजे अचूक बिलिंग, पारदर्शकता, वीजदरातील सवलत आणि ग्राहक-सुविधांचा संगम आहे. बदलत्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्मार्ट मीटर बसविणे ही काळाची गरज असून, त्याचा थेट फायदा वीजग्राहकांनाच होणार आहे. ग्राहकांनी हे मीटर बसवण्यासाठी सहकार्य करून अचूक बिलांचा व सवलतींचा लाभ घ्यायला हवा.








