मुंबई, दि. ०९ (प्रतिनिधी) : मुंबईची शिरा समजली जाणारी उपनगरीय लोकल रेल्वे पुन्हा एकदा मृत्यूचे साधन ठरली. सोमवार, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर परतणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी मुंब्रा स्थानकाजवळील वळण प्राणघातक ठरले. विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन जलद लोकल गाड्यांच्या फुटबोर्डवर लटकलेले प्रवासी एकमेकांना घासले गेले.
मुंब्रा–दिवा दरम्यानच्या लोकल ट्रेनच्या अपघातात ४ प्रवासी ठार झाले असून, ९ जखमी झाले आहेत. सुमारे १३ प्रवासी गाडीतून खाली पडले, त्यापैकी ४ जणांचा मृत्यू झाला आणि उरलेले ९ जखमी झाले, अशी माहिती अधिकृतपणे समोर आली आहे
मुंब्रा स्थानकाच्या दिवा दिशेने असलेले तीव्र वळण या अपघातास कारणीभूत ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. या वळणावरून धावणाऱ्या गाड्यांचे डबे झुकतात, याबाबत अनेक वेळा प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, उपाययोजना न झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली, अशी जोरदार टीका लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांकडून केली जात आहे.
वळणांचे संकट आणि प्रशासनाचे दुर्लक्ष
कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकादरम्यान तीव्र वळणांचा फेरा आहे. मराठी एकीकरण समितीचे उपाध्यक्ष आनंदा पाटील यांनी या वळणावरून डबे झुकत असल्याची तक्रार फेब्रुवारी २०२५ मध्ये रेल्वे प्रशासनाकडे नोंदवली होती. गर्दीच्या वेळात फुटबोर्डजवळ उभे असलेले प्रवासी डबे झुकल्याने रेट्यांमुळे खाली पडतात, असे निरीक्षण त्यांनी मांडले होते.
मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनीही रेल्वे प्रशासनाला तीन महिन्यांपूर्वी या धोक्याची पूर्वसूचना दिल्याचा दावा करत, “या घटनेला संपूर्ण रेल्वे जबाबदार आहे,” अशी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा “दिवा-मुंब्रा दरम्यानचा वळणाचा भाग खतरनाक असून, रेल्वेने याकडे दुर्लक्ष केल्याचे” ठपका ठेवला आहे.
रेल्वेचे उत्तर अपुरे, कृती गायब
आनंदा पाटील यांच्या तक्रारीनंतर रेल्वेने वळणावर तांत्रिक उपाययोजना केल्याचे उत्तर दिले होते. ट्रॅकच्या बाहेरील बाजूच्या रुळांची उंची वाढवून संतुलन राखले जात असल्याचा दावा रेल्वेने केला होता. मात्र, प्रत्यक्ष सुरक्षाव्यवस्थेबाबत कोणतीही ठोस कृती करण्यात आलेली नाही, अशी प्रवाशांची तक्रार आहे.
“वाढत्या गर्दीकडे दुर्लक्ष न करता, अतिरिक्त फेऱ्या, डबे वाढवणे आणि सुरक्षेसाठी गार्ड रेलिंगसारखी संरचना उभारणे अत्यावश्यक आहे,” असेही पाटील यांनी म्हटले.
धोकादायक मार्गिका आणि अपघाताचा इतिहास
दिवा-ठाणे मार्गावरील पाचवी आणि सहावी मार्गिका फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू करण्यात आली होती. पूर्वी धीम्या लोकलसाठी वापरण्यात येणारा हा मार्ग आता जलद लोकलसाठी वापरण्यात येतो आहे. त्यामुळे वळणावर वेगात धावणाऱ्या गाड्यांचे डबे झुकतात आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
१५ महिन्यांत ३०००हून अधिक प्रवाशांचा बळी
१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत मुंबई लोकलने ३०१८ प्रवाशांचे प्राण घेतले असून, ३३१९ जण जखमी झाले आहेत. ‘ट्रेसपासिंग’ म्हणजेच रेल्वे रुळ ओलांडताना १४२० मृत्यू झाले आहेत. ठाणे, कुर्ला, कल्याण आणि वाशी ही अपघातांची ‘हॉटस्पॉट’ ठरली आहेत. त्यातही मध्य रेल्वे विभाग सर्वाधिक धोकादायक असून, ठाणे स्थानकावर सर्वाधिक १९५ मृत्यू झाले आहेत.
दुर्घटनास्थळी रेल्वे अधिकाऱ्यांची पाहणी
अपघातानंतर रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंब्रा स्थानकाजवळील वळणाची पाहणी केली. ट्रॅकवरचा वळणाचा झुकाव, गाड्यांमधील अंतर आणि प्रवासी दाटी यांचा सर्वंकष तपास सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.