मुंबई, दि. २४ : मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि तो आमचाच असणार, अशा ठाम शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा केली. वरळी सी-फेस येथील ब्लू सी हॉटेलमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर दिसल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून मराठी राजकारणात नवे समीकरण आकाराला येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, “जे काही उरलेलं बोलायचं आहे ते जाहीर सभा सुरू झाल्यानंतर बोलेन. मात्र एका मुलाखतीत मी स्पष्टपणे म्हटलं होतं की, कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. मला वाटतं त्या वाक्यापासूनच आमच्या एकत्र येण्याची सुरुवात झाली.” युतीतील जागावाटपाबाबत विचारणा केली असता राज ठाकरे यांनी यावर सध्या कोणताही आकडा सांगण्यास नकार दिला. “राज्यात सध्या लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या फिरत आहेत. त्यात दोन टोळ्या अजून जास्त अॅड झाल्या आहेत. त्या राजकीय पक्षांमधील उमेदवार पळवतात,” अशा शब्दांत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मिश्कील पण टोचणारी टिप्पणी केली. शिवसेना आणि मनसेची युती अधिकृतपणे जाहीर करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनीही या वेळी भावनिक आणि इतिहासाची आठवण करून देणारे भाषण केले. “आज आम्ही दोघं ठाकरे म्हणून इथे बसलो आहोत. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पहिल्या पाच सेनापतींपैकी एक होते. त्यांच्यासोबत माझे वडील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि राज यांचे वडील श्रीकांत ठाकरे, म्हणजे संपूर्ण ठाकरे घराणं त्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष करत होतं,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मुंबई महाराष्ट्राला सहज मिळाली नाही. १०५ किंवा १०७ पेक्षा जास्त मराठी माणसांनी बलिदान दिलं आहे. तो जो मंगल कलश महाराष्ट्रात आला, तो कुठल्याही धार्मिक पूजेसाठी नव्हता, तर संघर्षातून आलेला होता. त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे.” मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यानंतरही मराठी माणसावर अन्याय सुरूच राहिल्याने शिवसेनेचा जन्म झाला, असेही त्यांनी सांगितले.
“जर आपण आपापसात भांडत राहिलो, तर हुतात्म्यांचा आणि त्या संघर्षाचा अपमान होईल. म्हणूनच आम्ही आज एकत्र आलो आहोत आणि हे एकत्र येणं केवळ निवडणुकीपुरतं नाही, तर कायम एकत्र राहण्यासाठी आहे,” असे स्पष्ट करत उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केले. “आता जर चुकाल, तर संपल. फुटाल, तर पूर्णपणे संपून जाल,” असे परखड शब्द त्यांनी वापरले. मुंबई किंवा महाराष्ट्र वेगळा करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्याचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथ घेऊन मैदानात उतरलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
या ऐतिहासिक क्षणावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजचा दिवस महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक असल्याचे सांगितले. “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर मराठी ऐक्याचा जो मंगल कलश आला होता, तो आज पुन्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्या समोर घेऊन आले आहेत. हाच कलश मुंबईसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये भगवा फडकवेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता केवळ ठाकरे घराण्याकडेच आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
युतीच्या घोषणेनंतर शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. वरळी परिसरात घोषणाबाजी, फटाके आणि जल्लोष करण्यात आला. “आज आमच्या घरात दिवाळी आणि दसरा एकाच दिवशी आहे,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले की, हा मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण आहे. “दोन्ही भावांनी एकत्र यावं, ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती,” असे त्यांनी सांगितले. शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनीही या युतीमुळे मुंबईतील मराठी समीकरण पुन्हा एकदा मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला. “गेल्या ३० वर्षांत शिवसेनेची सत्ता मुंबईत राहिली आहे आणि ती पुन्हा अबाधित राहील,” असे ते म्हणाले.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बाळासाहेब ठाकरेंची इच्छा प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान व्यक्त केले. “शिवसैनिक आणि मनसैनिक निष्ठावंत आहेत. ते नक्कीच विजय खेचून आणतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही मराठीसाठी एकत्र लढण्याचा निर्धार व्यक्त करत हा मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण असल्याचे सांगितले.
दरम्यान, राजकीय तज्ज्ञांकडून या युतीबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, ही युती मराठी मतांचे एकत्रीकरण करू शकते, तर काहींच्या मते केवळ भावनिक इव्हेंट म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, उद्धव ठाकरे यांची जी दुबळी अवस्था निर्माण झाली होती, ती ही युती काही अंशी मजबूत करू शकते; मात्र याचा थेट मोठा राजकीय फायदा होईल का, याबाबत शंका कायम आहेत.
तरीही, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मराठी राजकारणात नवा उत्साह निर्माण झाला असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये या युतीचा नेमका परिणाम काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुंबईचा महापौर मराठीच होणार, या घोषणेसह ठाकरे बंधूंनी दिलेला हा संदेश मराठी अस्मितेच्या राजकारणाला नवे वळण देणारा ठरणार, हे मात्र निश्चित आहे.








