मुंबई (घाटकोपर), दि. २४ : जागतिक आयव्हीएफ दिन (वर्ल्ड आयव्हीएफ डे) जवळ येत असताना सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील भारतीयांना भेडसावणाऱ्या ‘वंध्यत्व’ या आरोग्यसमस्येवर प्रकाश टाकणे महत्त्वाचे आहे. या आजाराला मौनाच्या आणि कलंकाच्या पांघरुणाखाली झाकलेले असते. हा केवळ एक वैयक्तिक संघर्ष नसून सार्वजनिक आरोग्य समस्या आहे आणि या आरोग्य समस्येकडे तातडीने लक्ष पुरवणे आणि हाताळणे आवश्यक आहे.
संततीनियमनाच्या साधनांचा वापर न करता वर्षभर शारीरिक संबंध ठेवून गर्भधारणा झाली नाही तर वंध्यत्वाची समस्या हे त्याचे कारण असू शकते. जगभरात सुमारे 10-15% जोडप्यांना या समस्येला सामोरे जावे लागते. भारतात हे प्रमाण वाढत आहे. भारतातील सुमारे 2.75 कोटी जोडपी वंध्यत्वाच्या समस्येशी झुंजत आहेत. जीवनशैलीतील बदल, विवाह करण्याचे वाढलेले वय, उशीरा होणारी गर्भधारणा, शहरीकरण आणि पीसीओएस व एंडोमेट्रिऑसिससारख्या वैद्यकीय समस्या हे वंध्यत्वाला कारणीभूत ठरणारे घटक असू शकतात.
क्लारा आयव्हीएफमधील आयव्हीएफ स्पेशालिस्ट डॉ. चैताली टावरे म्हणाल्या, “वंध्यत्वाच्या समस्येचा सामना करणाऱ्या जोडप्यांसाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (आयव्हीएफ) हा एक आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे. या उपचारांमुळे प्रजनन औषधांमध्ये परिवर्तन घडून आले आहे. आयव्हीएफमध्ये ओव्हरींमधून बीजांडे (एग्ज) घेतली जातात आणि प्रयोगशाळेत शुक्राणूसोबत ती फलित केली जातात. त्यानंतर त्या गर्भाचे गर्भाशयात प्रत्यारोपण करण्यात येते. ज्यांना नैसर्गिक गर्भधारणा होण्यास समस्येला सामोरे जावे लागत आहे, अशा अनेक जोडप्यांमध्ये या पद्धतीने गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
“वैद्यकीय तंत्रज्ञान आणि तत्रांमध्ये झालेल्या प्रगतीमुळे आयव्हीएफ यशस्वी होण्याच्या दरात उत्तरोत्तर सुधारणा होत आहे. इंडियन सोसायटी फॉर असिस्टेड रिप्रोडक्शनच्या आकडेवारीनुसार जागतिक मानकांशी तुलना करता भारतातील ३५ वर्षांखालील महिलांमध्ये आयव्हीएफ यशस्वी होण्याचे प्रमाण प्रति सायकल ३०% ते ३५% आहे. प्रिइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (पीजीटी) आणि इम्प्रूव्ह्ड एम्ब्रियो कल्चर तंत्रांमुळे यशस्वितेच्या प्रमाणाच अजून वाढ केली आहे. कारण या पद्धतीत सुदृढ गर्भाची निवड केली जाते, त्यामुळे अनुवांशिक आजारांची जोखीम कमी होते आणि गर्भधारणेची शक्यता वाढते.”, अशी पुष्टी डॉ. टावरे यांनी जोडली.
आयव्हीएफ ही पद्धत आश्वासक असली तरी आयव्हीएफची उपलब्धता आणि खर्च हा भारतात एक अडथळा होऊन राहिला आहे. आयव्हीएफच्या एका सायकलचा खर्च साधारण १ ते १.५ लाख आहे. अनेक जोडप्यांसाठी हा खर्च परवडत नाही. विशेषतः कनिष्ठ सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेल्यांना हा खर्च परवडत नाही. हे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्यात यावेत यासाठी तमिळनाडूसारख्या काही राज्य सरकारांनी सरकारी रुग्णालयांमध्ये सवलतीच्या दरात ART कार्यक्रम राबविण्यास सुरुवात केली.
आयव्हीएफ आणि वंध्यत्वावरील इतर उपचारांची व्याप्ती वाढविण्यासाठी धोरणे आखणे महत्त्वाचे आहे. वंध्यत्वारील उपचार आरोग्य विमा संरक्षणात समाविष्ट केल्यास जोडप्यांवर येणारा आर्थिक भार मोठ्या प्रमाणावर कमी होईल. या व्यतिरिक्त, गर्भधारणेशी संबंधित रजा देणारी पूरक कार्यस्थळ धोरणे राबविल्यास या उपचारांमुळे येणारा कमी होण्यास मदत होईल.
वंध्यत्वाच्या समस्येला हाताळण्यासाठी बहुआयामी दृष्टीकोन आवश्यक आहे. त्याची सुरुवात जागरुकता वाढविण्यासापासून केली पाहिजे. वंध्यत्वाबद्दलचे गैरसमज दूर करणे आणि या समस्येशी जोडला गेलेला कलंक कमी करणे महत्त्वाचे आहे. प्रजनन आरोग्याबद्दल खुल्या चर्चा होण्यासाठी आणि कुठलाही अवघडलेपणा वाटू न देता वैद्यकीय मदत घेण्यास जोडप्यांना प्रोत्साहन देणे यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियाने आणि शिक्षण यांची महत्त्वाची भूमिका असेल.








