फेरीबोटीचे कोकणात जल्लोषात स्वागत; पहिल्याच फेरीतून ३९० प्रवासी दाखल

रत्नागिरी, दि. १ : गेले अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेली बहुचर्चित मुंबई–विजयदुर्ग ‘रो-रो (रो-पॅक्स)’ जलवाहतूक सेवा रविवारी कोकणात दाखल झाली. भाऊचा धक्का (मुंबई) येथून सकाळी रवाना झालेली ही फेरी सायंकाळी ४.२० वाजता विजयदुर्ग बंदरात पोहोचताच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. या पहिल्याच फेरीतून तब्बल ३९० प्रवाशांनी प्रवास केला असून २१ चारचाकी वाहने आणि १३ दुचाकी वाहने या बोटीतून कोकणात दाखल झाली.

या फेरीबोटीने आलेल्या प्रवाशांचे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी तसेच स्थानिक प्रशासनाच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे गोव्याकडे जाणारे अनेक पर्यटक आपल्या खासगी वाहनांसह या पहिल्या फेरीने सिंधुदुर्गमार्गे पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

मुंबईहून कोकणात येताना या फेरीत कोकणवासीयांनी भजनाचा गजर करत प्रवास केला. मुंबई परळ येथील, मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमोद धुरी यांच्या भजनांनी संपूर्ण बोट भक्तीमय वातावरणाने भारावून गेली होती. शिमगोत्सवासाठी कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही फेरी विशेष आकर्षण ठरली.

दरम्यान, या फेरीबोटीची परतीची सेवा सोमवारी दुपारी १२ वाजता विजयदुर्ग येथून मुंबईकडे रवाना होणार असून परतीच्या प्रवासासाठी आतापर्यंत १३० प्रवाशांनी बुकिंग केले असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

मुंबई–विजयदुर्ग ‘रो-पॅक्स’ जलवाहतूक सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधून साकार झाला आहे. भाऊचा धक्का येथे नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवून या ऐतिहासिक सेवेची पहिली फेरी रवाना केली.

ही अत्याधुनिक रो-पॅक्स बोट सुमारे ६२५ प्रवासी क्षमता असलेली असून एकाच वेळी ४० चारचाकी आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर आता अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांचा वेळ आणि श्रम मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.

या सेवेच्या माध्यमातून कोकणातील पर्यटनाला नवी चालना मिळणार असून स्थानिक व्यापार, मत्स्यव्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि कोकण यांमधील दळणवळण अधिक सुलभ झाल्याने चाकरमान्यांसह पर्यटकांसाठीही हा प्रवासाचा नवा आणि आकर्षक पर्याय ठरणार आहे.

आणखी वाचा