रत्नागिरी, दि. २८ : नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून मतदानासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार नौसीन काझी यांनी विरोधकांनी विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांचा पुराव्यांसह खुलासा केला आहे.
नळपाणी योजनेचे श्रेय विरोधकांकडून घेतले जात असल्याचा मुद्दा उचलून धरत काझी म्हणाले की, प्रत्यक्षात ही योजना दर्जाहीन आणि त्रुटीपूर्ण असून नागरिकांना अद्याप त्याचा दर्जेदार लाभ मिळालेला नाही. त्याचप्रमाणे “रस्त्यांचा विकास केला” या विरोधकांच्या दाव्यालाही त्यांनी प्रत्युत्तर देत प्रभागातील खराब, खड्डेमय रस्त्यांचे फोटो आणि दस्तऐवज सादर केले. “विकास केला असल्याचा दावा करताना प्रत्यक्षात रस्त्यांची दुर्दशा लपवली जाते,” असा टोला त्यांनी लगावला.
टेनिस कोर्ट उभारणीचे उदाहरण देत काझी यांनी सांगितले की, या कामाचा स्थानिक नागरिकांना काहीही प्रत्यक्ष फायदा नाही. “याठिकाणी जर व्यापारी संकुल उभारण्यात आले असते तर युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या,” असा मुद्दाही त्यांनी मांडला.
कब्रस्तानाचा विषय निवडणुकीत राजकारणासाठी वापरणे चुकीचे असल्याचे सांगताना काझी म्हणाले की, या कामासाठी कोणत्याही एका व्यक्तीचे नव्हे तर सर्वांचेच प्रयत्न आहेत. अद्ययावत जिम उभारण्यात आल्याचा दावा करणाऱ्यांना त्यांनी थेट प्रश्न केला—“ती जिम आहे तरी कुठे? आणि स्थानिक युवक त्याचा लाभ घेत आहेत का?”
यावेळी काझी यांनी स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक ४ मध्ये विकासाचा मोठा निधी आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे थेट आशिर्वाद आणि सहकार्य लाभणार आहे. “प्रभागात विकासाची गंगा वाहणार आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेवटी, आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना घड्याळ या निशाणीवर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन नौसीन काझी यांनी मतदारांना केले.








