राज्यसभेसाठी शरद पवारांचे नाव निश्चित? मविआमध्ये अखेर एकमत

मुंबई, दि. ०३ : राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली असून येत्या 16 तारखेला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सात जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामध्ये महायुतीकडे सहा जागा तर महाविकास आघाडीकडे (मविआ) एक जागा आहे. महायुतीत भाजपला चार, शिंदे गटाच्या शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून एकमेव जागेसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. सुरुवातीला काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) दोन्ही पक्षांकडून आपापल्या उमेदवारांसाठी आग्रह धरला जात होता. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता तोडगा निघण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मविआकडून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये शरद पवार यांच्या नावावर एकमत झाल्याची माहिती आहे. शरद पवार यांनी पुन्हा दिल्लीला जाण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाशी तसेच शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या चर्चांनंतर काँग्रेसकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनीही शरद पवार यांच्या नावाला संमती दिल्याचे समजते.

या प्रक्रियेत दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने हा तिढा सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा संसदेत सक्रिय भूमिका निभावण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

दरम्यान, भाजपकडून सहा राज्यांतील नऊ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाही. शिंदे गटाच्या शिवसेनेतही कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्षांची हालचाल वेगाने सुरू आहे.

देशभरात राज्यसभेच्या एकूण 37 जागांसाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून सर्वाधिक सात जागा आहेत. तामिळनाडूतील सहा, बिहार आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी पाच, ओडिशातील चार, आसाममधील तीन, तेलंगणातील दोन आणि छत्तीसगड, हरियाणा व हिमाचल प्रदेशमधील प्रत्येकी एका जागेसाठी मतदान होणार आहे.

या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्यास आगामी निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरणार असून दिल्लीतील समीकरणांवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा