उद्योग दिशा कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रत्नागिरी, दि. १८ : नारी शक्ती फाउंडेशन आणि लाईफ टाईम उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे महिलांसाठी “उद्योग दिशा” या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

या कार्यक्रमात स्वयंरोजगार, गृहउद्योग, बचत गटांमार्फत चालविण्यात येणारे उद्योग, तसेच भांडवल उभारणी, मार्केटिंग आणि शासकीय अनुदानित योजनांबाबत उपस्थित तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांना उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, संधी आणि उपलब्ध शासकीय मदतीची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून धनलक्ष्मी इंडस्ट्रीचे सीईओ श्री. संजय बगे, लाईफ टाईम उद्योग समूहाचे संस्थापक श्री. सचिन माजळकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. राजू भाटलेकर, प्रताप पवार, ॲड. प्रतिभा पवार तसेच रत्नसिंधू न्यूज मीडियाच्या वर्षा राजे निंबाळकर उपस्थित होते.

नारी शक्ती फाउंडेशनच्या संस्थापक संजना मोहिते, अंतरा मोहिते, पौर्णिमा सावंत, दिपाली कांबळे, सुप्रिया कांबळे व सलोनी मोरे यांनी उत्कृष्ट नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमास सुमारे १५० महिलांची उपस्थिती होती, तर हळदी-कुंकू समारंभास ३५० महिलांनी सहभाग नोंदवला.

“महिलांना सक्षम करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त असून, आज मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून महिलांनी स्वतःसह कुटुंब व समाज सशक्त करावा,” असे मत वर्षा राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

आणखी वाचा