रत्नागिरी, दि. २१ : मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगात माणूस बाह्य प्रगतीकडे धाव घेत असताना स्वतःच्या मनाकडे मात्र दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अस्वस्थता, तणाव, नैराश्य आणि मनशांतीचा अभाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत मनाला योग्य दिशा देण्यासाठी आणि जीवनात समतोल राखण्यासाठी ‘मनशक्ती’सारख्या विज्ञानाधिष्ठित माध्यमाची आजच्या काळात अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.
शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळे आणि मनशक्ती केंद्र, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यश–शांतीसाठी न्यू वे’ या दोन दिवसीय विनामूल्य उपक्रमाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (ता. २१) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैदेही रानडे होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, जीवनदानी साधक मयूर चंदने, रत्नागिरी केंद्राचे ज्येष्ठ साधक राजन नाईक तसेच राजश्री मालुष्टे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला आशा सेविका, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध शाळांमधील विद्यार्थी, युवक-युवती आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात वैदेही रानडे यांनी सांगितले की, ‘यश–शांतीसाठी न्यू वे’ ही नव्या पिढीला आकर्षित करणारी आणि अत्यंत समर्पक टॅगलाईन आहे. हा उपक्रम केवळ अध्यात्मिक नाही, तर पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित असून मानवी जीवनाच्या विविध टप्प्यांवर उपयुक्त ठरणारा आहे. जन्मपूर्व अवस्थेपासून ते आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत माणसाच्या मनाचा विचार करून मनशक्ती संस्थेने विविध विषयांवर विवेचन सत्रांचे आयोजन केले आहे. या सत्रांमधून मनाची शक्ती, एकाग्रता, स्मरणशक्ती, निर्णयक्षमता यांचा विकास कसा होऊ शकतो, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मिळते.
त्या पुढे म्हणाल्या की, सामान्यतः आपण गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या केवळ शारीरिक पोषणाचा विचार करतो. मात्र, त्या मातेच्या आणि गर्भातील बाळाच्या मनाचाही तितकाच विचार होणे गरजेचे आहे. हा विचार मनशक्तीने अत्यंत प्रभावीपणे मांडलेला आहे. या उपक्रमांतर्गत मनाची एकाग्रता मोजणारे, मेंदूला चालना देणारे, तसेच स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रेरणा देणारे विविध वैज्ञानिक प्रयोग सादर करण्यात आले आहेत. मनशक्तीचे विज्ञानाधिष्ठित कार्य गेली तब्बल पन्नास वर्षे अखंडपणे सुरू असून, त्यातूनच या संस्थेच्या कार्याचे महत्त्व आणि विश्वासार्हता अधोरेखित होते, असेही त्यांनी नमूद केले.
आज लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागत आहे. स्पर्धा, अपेक्षा आणि डिजिटल जीवनशैलीमुळे मनशांती हरवत चालली आहे. अशा वेळी मनशक्तीच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होणे हे आपल्या मनाला निश्चितच योग्य दिशा देणारे ठरेल, असा विश्वासही वैदेही रानडे यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने प्रचंड प्रगती केली असली तरी माणूस आतून अस्वस्थच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत राहात नाही. ही अस्थिरता वाढत चालली असून, लहान विद्यार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर ताण सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत मनशक्ती केंद्राचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. मनाला शांतता देणारे, सकारात्मक विचारांची जोड देणारे हे उपक्रम समाजाला दिशा देणारे आहेत. एक नगराध्यक्ष म्हणून मलाही मनशक्तीची गरज आहे. मनशक्ती पाठीशी असेल तर आपण अधिक प्रभावीपणे काम करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचे भविष्य असल्याने हे उपक्रम सर्व शाळांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविकात मनशक्ती प्रयोग केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे यांनी सांगितले की, रत्नागिरी ही विचारवंतांची आणि देशभक्तांची भूमी आहे. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या थोर विभूतींच्या विचारांचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. ज्या सावरकर नाट्यगृहात हा उपक्रम होत आहे, त्या सावरकरांनी बालपणापासूनच देशासाठी जीवन अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली होती. अशा प्रेरणादायी भूमीत मनशक्तीचा उपक्रम होत असल्याचा विशेष आनंद आहे.
लहान मुले, युवक, प्रौढ यांना रोजच्या जीवनात मनशांती कशी मिळवायची, याचे शास्त्रशुद्ध मार्गदर्शन मनशक्तीने दिले आहे. यामध्ये विवेचन सत्रांसह ‘माईंड जिम’सारखा भव्य प्रकल्प, सुमारे २०० ग्रंथांचे आणि प्रयोगात्मक साहित्याचे प्रदर्शनही मांडण्यात आले आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा व्यापक दृष्टिकोन ठेवून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा, असे आवाहनही प्रमोदभाई शिंदे यांनी केले.








