मुंबई, दि. १७ : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने खबरदारीची पावले उचलली आहेत. शिवसेना (शिंदे गट)चे 29 नगरसेवक सत्तास्थापनेपर्यंत मुंबईतील वांद्रे परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सत्तास्थापनेदरम्यान कोणतीही फोडाफोडी अथवा घोडेबाजार होऊ नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या सर्व 29 नगरसेवकांना बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत संबंधित पंचतारांकित हॉटेलमध्ये हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुढील तीन दिवस तेथेच मुक्काम करण्यास सांगण्यात आले असून, सत्ता स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्व नगरसेवक एकत्रच राहतील, अशी खबरदारी घेतली जात आहे.
मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 नगरसेवकांचे बहुमत आवश्यक आहे. भाजपाने 89 जागा जिंकत सर्वाधिक जागा मिळवल्या असल्या, तरी त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे भाजपाला शिवसेना (शिंदे गट)च्या पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे 65 नगरसेवक निवडून आले असून, मनसे आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळाल्यास हा आकडा 98 पर्यंत पोहोचतो. कोणत्याही एका गटाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी 2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर सत्तास्थापनेदरम्यान शिवसेनेने संख्याबळ वाढवण्यासाठी मनसेचे सात नगरसेवक फोडल्याचा आरोप झाला होता. तसेच 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी स्थापन होताना तिन्ही पक्षांच्या आमदारांना विविध हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. 2022 मध्ये शिंदे गटातील 40 आमदार गुवाहाटीत दाखल झाल्याची घटना अद्याप ताजी असतानाच, चार वर्षांनंतर पुन्हा एकदा ‘हॉटेल पॉलिटिक्स’ चर्चेत आली आहे. मागील अनुभव लक्षात घेता, सत्तासमीकरण बिघडू नये म्हणून लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी ठेवण्याची पद्धत पुन्हा वापरण्यात येत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, शिवसेनेने घेतलेल्या या खबरदारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी, “आता पळवापळवी करण्याचे कोणतेही कारण नाही. सर्व निर्णय शांतपणे आणि एकत्र घेतले जातील. त्यामुळे अशा शक्यतांचा प्रश्नच नाही,” असे स्पष्ट केले.
तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. “त्यांना भाजपाची भीती वाटते. एकदा फुटलेले लोक पुन्हा फुटू शकतात. शिंदे गटातील अनेक नगरसेवक मूळचे आमचेच आहेत. भाजप महापौरपदासाठी त्यांचे नगरसेवक फोडू शकते,” असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
मुंबई महापालिकेच्या सत्तास्थापनेसाठी अजून काही कालावधी शिल्लक असून, तोपर्यंत कोणताही धोका पत्करायचा नाही, अशी भूमिका शिंदे गटाकडून घेतली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.








