राजापूर दि.२३ (आदित्य बाकाळकर): राजापूर शहरात नव्याने बांधण्यात आलेल्या मासे विक्री केंद्राचा अपेक्षित वापर होत नसल्याने शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने नियोजनपूर्वक उभारलेले मासे विक्री केंद्र अस्तित्वात असतानाही अनेक मासे विक्रेते त्या ठिकाणी बसत नसून शहरातील प्रमुख चौक व रस्त्यांवरच विक्री करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
विशेषतः राजापूर शहरातील जवाहर चौक परिसरातून छत्रपती शिवाजी महाराज पथमार्गावर मोठ्या प्रमाणात मासे विक्रेते, त्यातही महिला विक्रेत्या बसत असल्याचे आढळून येते. या ठिकाणी मासे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अरुंद रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने, रिक्षा आणि पादचारी यांची वर्दळ असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच ठिकाणी रस्त्यावरच मासे साफ करून देण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. मासे साफ करताना निर्माण होणारा कचरा, पाणी आणि अवशेष रस्त्यावरच टाकले जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढली आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि त्या भागातील रहिवाशांना दुर्गंधी व माश्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
याशिवाय रस्त्यावरील रिक्षा स्टॅण्ड आणि ॲपे स्टॅण्ड परिसरातही मासे विक्रेते बसत असल्याचे दिसून येते. रिक्षा व प्रवासी यांच्यासोबत मासे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची गर्दी एकाच ठिकाणी होत असल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. यामुळे वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असून अपघाताचा धोका वाढत आहे.
सदर मासे विक्रेते नाटे, सागवे, जैतापूर या ग्रामीण भागातून रोज राजापूर शहरात येत असल्याची माहिती आहे. मात्र नगरपरिषद व शासनाने नेमून दिलेल्या अधिकृत मासे विक्री केंद्रात न बसता ते रस्त्यांवरच विक्री करत असल्याने शहरातील नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. नव्या मासे विक्री केंद्रात आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध असूनही विक्रेते तेथे बसण्यास टाळाटाळ का करत आहेत, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण परिस्थितीकडे नगरपरिषद कोणती ठोस कारवाई करणार, याकडे आता शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. अधिकृत मासे विक्री केंद्रातच विक्रेत्यांना बसवणे, रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणे, स्वच्छता व वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अन्यथा भविष्यात शहरात आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








