राजापूर दि. १ (आदित्य बाकाळकर): राजापूर तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोंडये येथील पुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाच्या जोरदार धडकेत एका अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. मृत तरुणाचे वय अंदाजे २५ ते २८ वर्षांच्या दरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघात इतका भीषण होता की अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा कयास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, तसेच पोलीस कॉन्स्टेबल वारिक व घोगले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. ग्रामस्थांच्या माहितीनुसार सदर तरुणाचा मृतदेह कोंडये पुलाखाली आढळून आला होता. त्यामुळे हा अपघात पुलावरच घडून मृतदेह खाली फेकला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी कोंडये ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली आहे. अपघाताच्या वेळी संबंधित तरुणासोबत कोणी होते का, तसेच धडक देणारे वाहन कोणते होते, याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. मात्र अद्याप अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा तपास लागलेला नाही.
अपघातानंतर मृतदेह नाना कुवळेकर यांच्या रुग्णवाहिकेद्वारे राजापूर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मुंबई–गोवा महामार्गावरील वाढते अपघात आणि अज्ञात वाहनांमुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून मृत तरुणाची ओळख पटवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.