Ratnagiri : मिऱ्या येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात 1 death

समोरासमोर धडकेत एक ठार, तिघे गंभीर जखमी

रत्नागिरी, दि. १० (प्रतिनिधी): रत्नागिरी शहरालगतच्या मिऱ्या रोडवरील भाटी मिऱ्या परिसरात शनिवारी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू, तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघाताचा आवाज इतका जोरात होता की, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक दुचाकी रत्नागिरी शहराकडून मिऱ्याच्या दिशेने, तर दुसरी दुचाकी मिऱ्याकडून रत्नागिरी शहराकडे येत होती. भाटी मिऱ्या येथील धोकादायक वळणावर दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी तीन जण एकाच दुचाकीवरून प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती आहे. हे तिघेही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथून रत्नागिरीत फिरण्यासाठी आले होते, असे सांगण्यात येत आहे. जखमींपैकी एकाच्या जबड्यासह दात बाहेर येतील इतकी गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अन्य एक जण गंभीर जखमी असून, तिसऱ्याला तुलनेने किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पंचनामा करण्यात आला आहे. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. मिऱ्या रोडवरील वेगवान वाहतूक आणि वळणावरील अपघातांचे वाढते प्रमाण पाहता, नागरिकांकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

आणखी वाचा