रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी शहरात बसवण्यात आलेल्या ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी सध्या केवळ ७ ते ८ कॅमेरेच कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. कॅमेरे दुरुस्त करण्याबाबत वारंवार सूचना देऊनही संबंधित एजन्सीने दुर्लक्ष केल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा पोलिस दलामार्फत रत्नागिरी शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण ठेवणे तसेच अपघात आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने हे कॅमेरे महत्त्वाचे ठरतात. सुरुवातीला सर्व कॅमेरे कार्यरत होते आणि त्यांचे नियंत्रण पोलिस मुख्यालयातून केले जात होते. मात्र सध्या बहुतेक कॅमेरे बंद अवस्थेत आहेत.
कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी संबंधित कंपनीला अनेक वेळा कळवण्यात आले होते. तरीही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर एजन्सीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अपर पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
दरम्यान, एजन्सीने काही कॅमेरे दुरुस्त केल्याचा अहवाल पोलिसांना सादर केला आहे. मात्र हे कॅमेरे प्रत्यक्षात कार्यरत झाले आहेत की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करून खातरजमा केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या प्रकरणामुळे संबंधित एजन्सीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.








