रत्नागिरी, दि. १३ : जिल्ह्यातील बहुचर्चित वाटद–खंडाळा खूनप्रकरणाच्या तपासाला अखेर निर्णायक वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान काही मानवी हाडे आढळून आली असून, ही हाडे बेपत्ता असलेल्या राकेश अशोक जंगम याचीच असावीत, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर हाडे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आली असून, सीए (फॉरेन्सिक) अहवाल आल्यानंतरच याबाबत अधिकृत पुष्टी होणार आहे.
या खूनप्रकरणाच्या तपासात यापूर्वीही अनेक धक्कादायक खुलासे समोर आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत सीताराम लक्ष्मण वीर (वय ५५, रा. कळझोंडी) आणि राकेश अशोक जंगम (वय २८, रा. वाटद–खंडाळा) या दोघांचाही खून केल्याची कबुली दिली होती. दुर्वास पाटील याची प्रेयसी भक्ती मयेकर हिच्याशी सीताराम वीर यांचे मोबाईलवरून अश्लील संभाषण सुरू असल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याचे तपासात उघड झाले होते.
२९ एप्रिल २०२४ रोजी सीताराम वीर हे दुर्वास पाटीलच्या सायली बारमध्ये दारू पिण्यासाठी आले असता, दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि राकेश जंगम या तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत सीताराम वीर यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राकेश जंगम याला दारूचे व्यसन असल्याने तो खुनाबाबत कुणाला सांगेल, अशी भीती दुर्वास पाटीलच्या मनात निर्माण झाली. याच भीतीतून दुर्वासने राकेशचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
६ जून २०२४ रोजी कोल्हापूरला जायचे असल्याचे आमिष दाखवून दुर्वास पाटील याने राकेश जंगम याला कारमध्ये बसवले. कारने कोल्हापूरच्या दिशेने जात असताना दुर्वास पाटील, विश्वास पवार आणि सांगली येथील निलेश भिंगारडे यांनी कारमध्येच राकेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह आंबा घाट परिसरात फेकून देण्यात आला.
दरम्यान, राकेश घरी परत न आल्याने त्याची आई वंदना जंगम यांनी २१ जून २०२४ रोजी जयगड पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यानंतरही राकेशचा कोणताही ठोस सुगावा पोलिसांना लागला नव्हता. परिणामी, हे खूनप्रकरण तब्बल वर्षभर उलगडले नव्हते.
भक्ती मयेकर हिचा मृतदेह ज्या आंबा घाट परिसरात आढळून आला होता, त्याच परिसरात राकेश जंगमचा मृतदेह टाकण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली. अखेर पोलिसांनी त्या ठिकाणी पुन्हा कसून शोधमोहीम राबवली असता काही मानवी हाडे आढळून आली. ही हाडे नेमकी कोणाची आहेत, याचा अंतिम निर्णय न्यायवैद्यकीय अहवालानंतर होणार असून, या अहवालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








