रत्नागिरी, दि. २५ : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनी हिंदुत्वाचा नव्हे, तर राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी धार्मिक वादात न अडकता राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासावा, असे स्पष्ट मत ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.
नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय व नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित ‘मधु संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. या निमित्ताने त्यांनी संस्थेला दिलेली भेट अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरली. त्यांच्या उपस्थितीत नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वैचारिक व सांस्कृतिक परंपरेचा जणू जिवंत इतिहास साकार झाला.
मार्गदर्शन करताना मधुमंगेश कर्णिक यांनी सावरकर आणि टिळक यांच्या विचारांचा संदर्भ देत सांगितले की, त्यांनी कधीही संकुचित धार्मिक भूमिका घेतली नाही, तर देशप्रेम, स्वातंत्र्य आणि राष्ट्रीयत्वाचा व्यापक विचार समाजासमोर मांडला. सावरकरांनी अंदमानात देशासाठी भोगलेली शिक्षा समजून घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, गं. प्र. प्रधान, साने गुरुजी, बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते अशा समाजवादी व पुरोगामी विचारवंतांच्या संस्कारांतून घडलेल्या नवनिर्माण शिक्षण संस्थेत, या थोर नेत्यांना प्रत्यक्ष पाहिलेले आणि त्यांच्या विचारांनी घडलेले मधुमंगेश कर्णिक आज वयाच्या ९६ व्या वर्षीही तितक्याच उत्साहाने उपस्थित होते. या वैचारिक परंपरेचा ते आज एकमेव जिवंत दुवा असल्याची भावना उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.
कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही भेट साकार झाली. यावेळी मधुभाईंनी एस. एम. जोशी यांच्या महाराष्ट्रातील एकमेव पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत अनेक आठवणींना उजाळा दिला. नवनिर्माणच्या वैचारिक धाग्याला धरून त्यांनी मागील शतकातील रत्नागिरीच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.
केशवसुत, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधान आणि नवनिर्माण शिक्षण संस्था असा सुसंगत वैचारिक आलेख त्यांनी आपल्या ओघवत्या व रसाळ शैलीत मांडला. वयाच्या ९६ व्या वर्षीही त्यांची अफाट स्मरणशक्ती, तार्किक मांडणी आणि बौद्धिक स्पष्टता उपस्थितांना मंत्रमुग्ध करणारी होती.
यावेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये म्हणाले की, मधुमंगेश कर्णिक यांचे नवनिर्माणच्या प्रांगणात आगमन अत्यंत प्रेरणादायी आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या एस. एम. जोशी यांच्या आदर्शांवर उभी असलेली नवनिर्माण संस्था त्यांचा वैचारिक वारसा जपत आहे. जयवंत दळवी आणि बॅरिस्टर नाथ पै यांच्या विचारपरंपरेला पुढे नेण्याचे कार्य मधुमंगेश कर्णिक करीत आहेत. मालगुंड येथील त्यांनी उभारलेले केशवसुत स्मारक हे जागतिक दर्जाचे स्मारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपल्या मनोगतात मधुमंगेश कर्णिक म्हणाले की, आज भारताला खऱ्या अर्थाने नवनिर्माणाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम संविधानांपैकी एक असून ते टिकवणे आणि जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा भेदांमध्ये अडकण्याऐवजी आपण सर्व भारतीय आहोत, ही भावना रुजवण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
या कार्यक्रमाला भाषा व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रदीप ढवळ, प्राचार्य डॉ. संजय गवाळी, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, डॉ. पाखरे, लेखिका रश्मी कशेळकर, कवयत्री अमृता नरसाळे तसेच कोमसापचे पदाधिकारी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








