खंडाळा(रत्नागिरी), दि. १२ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, वाटद कवठेवाडी येथे राबविण्यात आलेला सलग १२ तास वाचन उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी, एकाग्रता आणि वैचारिक विकास घडविणारा उपक्रम असून अत्यंत अनुकरणीय असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध उद्योजक संतोष निंबाळकर यांनी व्यक्त केले. “डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची ओळख आणि त्यांचे कार्य समजून घेण्यासाठी वाचनासारखा उत्तम मार्ग नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सलग १२ तास वाचन करणे ही आदर्श गोष्ट आहे,” असे ते म्हणाले.
समारोप कार्यक्रमात सागरी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विलास दिडपिसे यांनी आजच्या युगात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व घडणीसाठी वाचन अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तर युयुत्सु आर्ते यांनी “वाचताना काय आणि कसे वाचावे” याबद्दल मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. बसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक पांडुरंग नाईक यांनी विद्यार्थ्यांनी वाचलेल्या विषयांचे सहजतेने सादरीकरण केल्याने या उपक्रमाची प्रभावीता दिसून येते, असे नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पा धनवाडे यांनी शाळा, पालक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे उपक्रम अधिक यशस्वी होत असल्याचे सांगितले. या उपक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्षा नमिता कीर, माजी अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिक्षणाधिकारी किरण लोहार, माजी शिक्षणाधिकारी बी. एम. कासार आणि प्रेरणा शिंदे यांनीही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. दिवसभर विविध शाळांचे शिक्षक, अधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनी भेट देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. या उपक्रमाचे नियोजन गटशिक्षणाधिकारी डॉ. दत्तात्रय सोपनूर, विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचे मुख्याध्यापक माधव अंकलगे आणि राधा नारायणकर यांनी केले.
मागील अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजविणारा ठरला असून यंदाही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.








