रत्नागिरी, दि. ०१ : खरेदी केलेल्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी तालुक्यातील चाफे सजाचा तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई १ जानेवारी २०२६ रोजी चाफे येथील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
बजरंग दत्तात्रय चव्हाण (वय ५१, सध्या रा. ओम शांती अपार्टमेंट, नाचणे, रत्नागिरी; मूळ रा. कोणेगाव, ता. कराड, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे आगरनरळ (ता. व जि. रत्नागिरी) येथे १० गुंठे बिनशेती जागा खरेदी केली होती. या मिळकतीचा फेरफार करून सातबारा उताऱ्यावर नाव दाखल करण्यासाठी त्यांनी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी चाफे तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. मात्र हे काम करून देण्यासाठी तसेच नाव लागलेला सातबारा व फेरफाराची प्रत देण्यासाठी तलाठी बजरंग चव्हाण याने तक्रारदाराकडे १० हजार रुपयांची लाच मागितली.
याप्रकरणी तक्रारदाराने ३१ डिसेंबर २०२५ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर १ जानेवारी २०२६ रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता, तलाठी चव्हाण याने लाच मागितल्याचे आणि स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने चाफे येथील तलाठी कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यात तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारताना तलाठी बजरंग चव्हाण याला रंगहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे, सुहास शिंदे आणि उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, सहायक पोलीस फौजदार उदय चांदणे, पोलीस हवालदार दीपक आंबेकर, श्रेया विचारे, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार, समिता क्षीरसागर आणि वैशाली धनवडे यांचा समावेश होता.
दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास एसीबीच्या टोलफ्री क्रमांक १०६४ वर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.








