रत्नागिरीत हरविलेले १८७ मोबाइल मालकांना परत; पोलीस दलाच्या संयुक्त मोहिमेला यश

रत्नागिरी दि. २४ : रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोधून मूळ मालकांना परत देण्याच्या मोहिमेत जिल्हा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी बजावत एकूण १८७ मोबाईल फोन शोधून मालकांच्या ताब्यात परत केले आहेत. हरवलेल्या मोबाईल्सचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतील अंमलदारांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष तपास पद्धतीचा वापर करून हे यश मिळवले. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते हे मोबाईल त्यांच्या मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

मार्च 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. या कालावधीत नागरिकांनी विविध ठिकाणी हरवलेले, चोरीला गेलेले आणि चुकीच्या हातात गेलेले मोबाईल शोधण्यासाठी सायबर पोलीस ठाणे, रत्नागिरीच्या प्रभारी पोलीस निरीक्षक स्मिता सुतार, पो.शि. अजिंक्य ढमढेरे तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अंमलदारांनी संयुक्त समन्वय साधला. तांत्रिक सहाय्याचा वापर, लोकेशन ट्रेसिंग, डिव्हाईस आयडेंटिफिकेशन यांचा वापर करून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली.

मोबाईल सुपूर्दगी कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सायबर फसवणूक, ऑनलाइन फ्रॉड किंवा मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये विलंब न करता तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे ते म्हणाले. तसेच अशा गुन्ह्यांमध्ये वेळेवर तक्रार देणे आणि तांत्रिक माहिती जतन करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर, सुरेश कदम, तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांनीही आपल्या हरवलेल्या मोबाईल्स परत मिळाल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले. पोलीस यंत्रणा आणि नागरिकांमधील विश्वासाची साखळी मजबूत करणारा हा उपक्रम ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

आणखी वाचा