रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे १८ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार

चिपळूण, दि. ०९ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना ,भाजपा महायुतीचे रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे हे येत्या गुरुवार दिनांक १८ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी दिली. रायगड रत्नागिरी मतदारसंघातील अन्य तालुक्या प्रमाणेच चिपळूण तालुक्यातून देखील खा. तटकरे यांना मोठे मताधिक्य आम्ही मिळून देणार आहोत असा विश्वासही ठसाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष व विद्यमान खासदार सुनील तटकरे १८. एप्रिल रोजी, अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करताना शिंदे गटाच्या आमदारांसह भाजपचे आमदारही उपस्थित राहणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी १७ एप्रिलला ते शिवसेना शिंदे गट, राष्टवादी अजित पवार गट, भाजप व अन्य मित्रपक्षांबरोबर चर्चा करणार असून बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रचाराची रणनीती कोणत्या पद्धतीने आखायची व प्रचारसभा कोणकोणत्या मतदारसंघासह तालुक्यात घ्यायच्या, याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

मागील निवडणुकीत सुनील तटकरे यांनी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभूत केले होते. पुन्हा रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विरुद्ध ‘उबाठा” गटाचे अनंत गीते यांच्यात लढत होणार आहे. यादोघांमध्ये कडवी झुंज होणार असल्याचे बोलले जात आहे.

चिपळूण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाणार असून आम्ही याची जय्यत तयारी पूर्ण केली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने अलिबाग येथे उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी केले आहे.

आणखी वाचा