रत्नागिरी, दि. ०९ (प्रतिनिधी): पहिल्यांच पावसात रत्नागिरी ते हातखंबा मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाची पाहणी करून संबंधीत विभागाला पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या सूचना केल्या होत्या. परंतु ठेकेदार कंपनीने सूचनांनाही न जुमानता आपला मनमानी कारभार सुरूच ठेवल्याने वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. खेडशी ते हातखंबा पट्ट्यात कुठेही पाणी जाण्यासाठी गटारे बांधण्यात आलेली नाहीत. पूर्णतः नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे सर्विस रोड चीखलमय झाला असून वाहनचालकांना चिखलाच्या रस्त्यामंधून प्रवास करावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम जोरदार सुरू होते. मात्र या कामाने पुन्हा संथ गती घेतली आहे. निवडणुकीच्या पूर्वी या कामाने काही प्रमाणात गती घेतली होती जणू काही दिवसात हा रोड पूर्ण होईल असे वाटत होते, परंतु आता निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कामाची गती मंदावल्याचे चित्र आहे. काही भागापूर्ती काँक्रीटीकरणची एक मार्गिका करून इतर भागात रस्त्यावर खडी पसरवून ठेवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मातीचा रोड तशाच स्थितीत आहे. त्यामुळे रस्त्यावर अक्षशः चिखलाचे साम्राज्य पसरले असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
रत्नागिरी ते हातखंबा हा वर्दळीचा रस्ता आहे. खेडशी ते हातखंबा भागात पाणी वाहून जाण्यासाठी गटारे बांधण्यात आलीं नसल्याने पाण्याचा निचरा होणार कसा? असा प्रश्न निर्माण होत आहे. चौपदरीकरणाचे रस्ते रुंद असल्याने रस्त्याच्या बाजूला असणारे नाले बुजवले गेले आहेत, नवीन नाले निर्माण करणे गरजेचे असताना ही पावसाळा तोंडावर आला तरीही ठेकेदार कंपनीने अद्याप नाले तयार केलेले नाही. पहिल्याच पावसात सर्वत्र पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहिले आहे. त्यामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. मात्र ठेकेदार कंपनीच्या नियोजनाच्या अभावामुळे भविष्यात जिल्हा प्रशासनाला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.
काही दिवांपूर्वीच दिल्या होत्या सूचना; नियोजनाचा मोठा अभाव-


काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी महामार्गाची पाहणी केली होती. त्यावेळी संबधित ठेकेदार कंपनीला समस्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच महामार्ग पोलीस उपअधीक्षक पलंगे यांनी महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीने इंजिनीयर यांची बैठक घेतली होती. यावेळी मातीच्या रोडवर डांबरीकरण करणे , रस्तावरील खड्डे बुजविणे, साईड पट्ट्या मारणे, पावसाळ्यात विविध निर्माण होणाऱ्या समस्या, अपघात टाळण्यासाठी महत्वाच्या सूचना बैठकीत करण्यात आल्या होत्या. परंतु या सूचनांकडे ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने पहिल्याच पावसात ही परिस्थिती ओढवली आहे.








