रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा ६८ वा वर्धापन दिन ; “श्री सत्यनारायण महापूजे” आयोजन

रत्नागिरी, दि. ०४ : रत्नागिरी जिल्हा मध्य. सहकारी बँक लिमिटेडचा ६८ वा वर्धापन दिन शुक्रवार, दि. ५ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा होत आहे. या निमित्ताने बँकेच्या प्रधान कार्यालयात, सहकार भवन, जवाहर पथ, रत्नागिरी येथे श्री सत्यनारायणाची महापूजा मोठ्या श्रद्धेने आयोजित करण्यात आली आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून बँकेच्या सर्व सभासद, ठेवीदार, खातेदार, कर्जदार आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या विशेष कार्यक्रमाला कृषिभूषण मा. डॉ. तानाजीराव चोरगे, अध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा मध्य. सह. बँक, तसेच मा. श्री. बाबाजीराव जाधव, उपाध्यक्ष – रत्नागिरी जिल्हा मध्य. सह. बँक, यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बँकेचे सर्व सन्माननीय संचालक मंडळही उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधिर गिम्हवणेकर यांनी हा उपक्रम आयोजित केला असून सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.

तीर्थप्रसादासाठी सकाळी १०.०० ते सायं. ६.०० या वेळेत व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक, सभासद आणि हितचिंतकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेकडून करण्यात आले आहे.

आर्थिक कामगिरीत सातत्याने उत्कृष्ट घोडदौड करत असलेल्या बँकेने ३१ मार्च २०२५ अखेर उल्लेखनीय प्रगती साधली आहे. भागभांडवल ६८.९३ कोटी, स्वनिधी ३४२.२७ कोटी, एकूण ठेवी २८६६.८७ कोटी, तर एकूण कर्जे २१९९.६४ कोटी इतकी झाली आहेत. बँकेने यावेळी ९४.६४ कोटी रुपये ढोबळ नफा कमावला असून सलग १५ वर्षे ‘अ’ वर्गाचे ऑडिट आणि १३ वर्षे नक्त एनपीए शून्य टक्के राखण्याचा विक्रम कायम ठेवला आहे.

याशिवाय शासनाचे सहकारनिष्ठव आणि सहकार भूषण हे दोन मानाचे पुरस्कार तसेच विविध संस्थांकडून मिळून १७ पुरस्कारांनी बँकेला सन्मानित करण्यात आले आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील सहकारी क्षेत्रातही या बँकेने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ठेवींवर सर्वोत्कृष्ट व्याजदर, अल्प व्याजदरात सोनेतारण कर्ज योजना आणि सहकार क्षेत्रात ३०% लाभांश देणारी ही जिल्ह्यातील एकमेव बँक ठरली आहे. बँकेने नुकताच ५००० कोटी व्यवसायाचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे.

ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा देण्यासाठी UPI, IMPS, QR कोड, RTGS/NEFT, ATM/POS/ECOM, SMS अलर्ट, ECS, DBT, मोबाईल बँकिंग आणि QR साऊंड बॉक्ससारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

वर्धापन दिनानिमित्त बँकेकडून ग्राहकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आर्थिक सक्षमीकरणाच्या प्रवासात नागरिकांनी सातत्याने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आणखी वाचा